रायबाग तालुका कामगार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : रायबाग तालुका कामगार विभागाचे कामकाज भाड्याच्या खोलीतून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असून साहित्य ठेवण्यासाठीही गोडाऊन उपलब्ध नाही. जोपर्यंत स्वत:चे कार्यालय होत नाही तोपर्यंत कार्यालयाचे स्थलांतर मिनी विधानसौधमध्ये करण्यात यावे. तसेच कामगारांच्या समस्या त्वरित सोडवून त्यांना विमा योजनाही उपलब्ध करून देण्याची मागणी रायबाग तालुका कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात, बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. यामुळे कामगारांना देणाऱ्या किटमध्ये तीन पट वाढ करण्यात यावी. कामगारांना स्वत: घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात यावेत. कामगारांना वैद्यकीय सुविधा व त्यांच्या पत्नींना सिझेरियनची सुविधा देण्यात यावी. 10 लाख मृत्यू तर 5 लाखांपर्यंत अपघाती विमा देण्यात यावा. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती व त्यांना लॅपटॉप द्यावे. कामगार कार्डांचे वितरण करून प्रत्येक तालुक्यात कामगारांच्या इमारती व कार्यालयांची संख्या वाढवावी. आपल्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. यावेळी कामगार उपस्थित होते.