For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुखापतीमुळे राहुल पाचव्या कसोटीतून बाहेर

06:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुखापतीमुळे राहुल पाचव्या कसोटीतून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारत व इंग्लंड यांच्यातील पाचवा व अखेरचा कसोटी सामना दि. 7 ते 11 मार्च दरम्यान धरमशाला येथे खेळवण्यात येणार आहे. केएल राहुल पाचव्या सामन्यात खेळणार की नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. राहुल दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडला आहे. तर चौथ्या सामन्यातील विश्रांतीनंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. याशिवाय, रणजी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यासाठी तामिळनाडूचा स्टार फलंदाज वॉशिग्टंन सुंदरलाही रिलिज करण्यात आल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. सध्याच्या घडीला केएल राहुल पूर्णपणे फिट नाही. तो उपचारांसाठी लंडनला रवाना झाला आहे. तो लंडनमधील तज्ञाकडून सल्ला घेणार असल्यामुळे पाचव्या कसोटीत खेळू शकणार नसल्याची माहिती बीसीसीआयने परिपत्रक जारी करत दिली आहे. तसेच, जसप्रीत बुमराहला रांची कसोटीपूर्वी संघातून मुक्त करण्यात आले होते. मात्र पाचव्या कसोटीसाठी त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. बुमराह धरमशाला येथे टीम इंडियामध्ये सामील होणार आहे. तर वॉशिंग्टन सुंदरला रणजी सामने खेळण्यासाठी संघातून मुक्त करण्यात आले आहे. सुंदर हा तामिळनाडूकडून मुंबईविरुद्ध रणजी सामना खेळणार आहे. गरज लागल्यास सुंदर शेवटच्या कसोटीत खेळेल. फेब्रुवारीच्या अखेरीस मोहम्मद शमीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. शमीच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होत असून तो लवकरच एनसीएमध्ये दाखल होईल. दरम्यान, वनडे वर्ल्डकपनंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर देखरेख करत असून तो लवकरच तंदुरुस्त होईल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

धरमशाला कसोटीसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

Advertisement

Advertisement
Tags :

.