For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rahul Patil म्हणतात, कार्यकर्त्यांच्या हितासाठी पक्ष बदलाला सहकार्य करा...

04:12 PM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
rahul patil म्हणतात  कार्यकर्त्यांच्या हितासाठी पक्ष बदलाला सहकार्य करा
Advertisement

काँग्रेसचे अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले

Advertisement

सांगरूळ : भोगावती सहकारी साखर कारखाना आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी ज्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेईन त्याला आपण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांनी सोमवारी केले. त्यांच्या या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देऊन त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय कारखाना स्थळी झालेल्या मेळाव्यात व्यक्त केला.

राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले. भोगावती साखर कारखान्याच्या सभागृहात मेळावा झाला. राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी आमदार स्व. पी. एन. पाटील-सडोलीकर यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाबद्दल राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी मंगळवारी कारखाना स्थळी हा मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात तालुक्यातून पक्षबदल प्रवेशाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावेळी बहुतांश कार्यकर्ते भोगावती कारखाना परिसरातीलच असल्याचे दिसले.

Advertisement

मेळाव्यात काहींनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर काहींनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशीच एकनिष्ठ राहू, अशी भूमिका घेतल्याचे समजते. यावेळी भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, . डी. चौगले, कृष्णराव पाटील, अमित पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

साखर कारखाना वाचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी राहू या, असेही यावेळी चर्चेनंतर ठरवण्यात आले. मात्र या मेळाव्याला राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, विधानसभा समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, चांदे माजी सरपंच अशोक साळोखे यांनी आपल्याला पक्ष बदलता येणार नाही.

आम्ही राष्ट्रीय काँग्रेससोबतच राहू, असा निरोप देऊन मेळाव्याकडे पाठ फिरवली. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, भोगावतीचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, माजी संचालक ए. डी. पाटील, संचालक रवींद्र पाटील यांचीही अनुपस्थिती चर्चेची ठरली.

गटाला बळ देण्याची ग्वाही

उपमुख्यमंत्री पवार यांनी राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्या गटाला योग्य न्याय देण्याची ग्वाही दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थांना शासनाचे सहकार्य करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बरोबरच जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात या गटाला मान-सन्मान देण्याची ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साक्षीने अजित पवार यांनी दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होती.

पी. एन. हाच पक्ष’ची चर्चा

पी. एन. पाटील हाच आमचा पक्ष आणि हाच आमचा विचार, आम्ही राहुल भैया सोबत’ ही टॅगलाईन करवीर तालुक्यामध्ये जोमात आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी पी. एन. पाटील यांच्या गटाच्या हितासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करावा, असा विचार प्रवाह पी. एन. एन पाटील यांना मानणाऱ्या बहुतांशी कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.