Rahul Patil-Sadolikar: कॉंग्रेसची साथ सोडणार?, मुश्रीफांसोबत चर्चा NCP मध्ये जाण्याची तयारी?
राहूल पाटील याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत
By : प्रशांत चुयेकर
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखाना अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात या असा प्रस्ताव संचालकांच्यासह नेत्यांच्यासमोर आहे. या कारखान्याचे नेते काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत.
त्यामुळे भोगावती कारखाना अडचणीत; काँग्रेसचे राहुल पाटील राष्ट्रवादीत! या चर्चेला करवीरमध्ये जोर धरला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या साखर कारखान्यांना सत्ताधारी नेते कोणतेही मदत करत नाहीत. तरीही भोगावती कारखान्याला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळा (एनसीडीसी) कडून कर्ज मंजूर झाले.
यासाठी महाराष्ट्र शासनाने हमी द्यावी लागते. यामुळे सत्तेत असणाऱ्या कोणत्यातरी पक्षात गेल्यास भोगावती कारखाना अडचणीतून बाहेर येऊ शकतो, असा विचार बहुतांशी संचालक करत आहेत.
मंत्री मुश्रीफ यांचा सल्ला
राज्य शासनाच्या हमीसाठी राहूल पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मंत्री मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यास सांगितली. उपमुख्यमंत्री पवार यांची पाटील यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी भोगावतीच्यासह मतदार संघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी प्रवेशाचा प्रस्ताव दिला. यावेळी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगू असे पाटील यांनी ना. पवार यांना सांगितले.
म्हणून भाजप नको...
करवीर विधानसभा मतदारसंघातील राहुल पाटील यांचे कार्यकर्तेही सत्ताधारी पक्षामुळे विकासकामे होत असल्याची चर्चा करत आहेत. त्यातून काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टी प्रवेशाच्याही चर्चा झाल्या. मात्र भाजप हा पूर्ण काँग्रेसच्या विचाराच्या विरोधातील पक्ष असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या होय-नाही मुळे भाजपची चर्चेला पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा पुरोगामी विचाराचा व काँग्रेसच्याच विचारसरणीचा असल्यामुळे हा पक्ष बरा असा विचारही कार्यकर्त्यांच्यामधून येत आहे.
कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय
"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा सुऊ आहेत. कार्यकर्ते जे सांगतील तोच निर्णय घेतला जाईल."
- राहुल पाटील-सडोलीकर