राहुल गांधींची परीक्षा सुरूच
लोकसभेत 99 जागा जिंकल्यावर राहुल गांधी समर्थकांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. आता काही काळाचाच अवकाश आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर फार काळ राहू शकत नाहीत, अशी आशा विरोधकांना झाली होती. सर्व दाने विरोधी पक्षांच्या बाजूने पडत होती. मोदी सरकारचा कारभारदेखील पूर्वीसारखा यथातथाच चालला होता. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कुबड्या घेऊन पंतप्रधान झाल्याने ‘कोणीही यावे टपली मारून जावे’ अशीच एक प्रकारे अवस्था मोदींची झाली होती. भाजपमधील एक गट तसेच संघदेखील आडून टोमणे मारू लागला होता. मानभावाने सल्ले देणे सुरु झाले होते. थोडक्यात काय ‘मोदी अब तो गयो’ असेच जणू झाले होते.
हरियाणामध्ये ज्याप्रकारे भाजपने काँग्रेसचा पराभव करून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली, अगदी अनपेक्षितपणे मिळवली त्याने मात्र चित्र अचानक पालटले आहे. मोदी-शहा यांनी अनपेक्षितपणे अशी बाजू पलटवल्याने भाजपमध्ये हजार हत्तींचे बळ आले नसते तरच नवल होते. हरियाणातील काँग्रेसचा पराभव म्हणजे एक प्रकारे 1761 साली पानिपतावर झालेला मराठ्यांचा पाडाव होय. पानिपत त्याकाळी जसे अनपेक्षितपणे घडले आणि त्याने मराठा साम्राज्याची अपरिमित क्षती केली तद्वतच काँग्रेसचे झाले आहे. या गर्तेतून बाहेर यायला वेळ लागणार आहे. एव्हढेच नव्हे तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. भाजपमधील एक गटदेखील आपला पक्ष हमखास हरणार असे छातीठोकपणे सांगत होता. याचाच अर्थ हरियाणाच्या निकालात काहीतरी काळेबेरे आहे हे काँग्रेसचे म्हणणे चुकीचेदेखील नसण्याची शक्यता आहे. त्याबाबत खुलासा होईल तेव्हा होईल. मोदी पंतप्रधान झाल्यापासून निवडणूक आयोगाची ख्याती फारशी चांगली नाही. टी. एन. शेषन यांना आयोग विसरले आहे. भाजपचे राज्यातील 11 पैकी 9 मंत्री निवडणूक हारतात आणि काँग्रेसची मते 11 टक्क्यांनी वाढतात यामुळेदेखील काहीतरी गडबड असण्याची शक्यता वर्तवली जाते. हरियाणाच्या या पराभवातून काय दिसून येत आहे? काल परवापर्यंत देशाचे भावी नेता म्हणून गाजावाजा केले गेलेले राहुल यांची उमेदवारी संपलेली नाही आणि मोदी-शहा यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर त्यांना काँग्रेसची संघटना मजबूत बांधल्याशिवाय पर्याय नाही हे प्रकर्षाने परत दिसू लागले आहे. आराम हराम हैं हा जवाहरलाल नेहरूचा मंत्र स्वीकारून राहुलनी वाटचाल केली तरच पुढचा रस्ता सापडणार आहे. हरियाणाच्या या पराभवाने राहुल गांधी यांची परत परीक्षा सुरु झाली आहे. त्या परीक्षेत ते किती पटकन आणि शिताफीने पास होतात त्यावर पुढील तीन-चार वर्षात राजकारण कसे आकार घेणार ते ठरणार आहे. काँग्रेस हा पक्ष नसून बाजारबुणग्यांची फौज आहे असे ठामपणे म्हणणारे बरेच दिसतात. हरियाणामुळे असे मानणारे वाढणार आहेत, वाढले आहेत. राहुल कितीही पोटतिडीकीने विरोधकांची पताका पुढे नेत असले तरी
त्यांच्या पक्षातील प्रत्येकजण प्रामाणिकपणे या मोहिमेत सहभागी आहे काय? असे विचारले तर त्याचे उत्तर देणे अवघड आहे. आपले कोण? आणि परके कोण? याबाबत एका वेगळ्या संदर्भात धनुर्धारी अर्जुनाला रणांगणावर प्रश्न पडला होता. त्याची शंका दूर करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते.
राहुलना असा उपदेश देणारा, वेळीच सावध करणारा, प्रत्यक्षातील जग वेगळे आहे हे सांगणारा कोणीही सल्लागार नाही. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ सारख्या त्वेषाने राहुल सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतात हे खरे पण भाजप साम, दाम, दंड, भेदच्या राजकारणात पटाईत असल्याने कावेबाजपणे तो डाव मारतो आणि काँग्रेसला नामोहरम व्हायची वेळ येते. असे फक्त आजच घडत आहे असे नाही. राजकारणातील छक्केपंजे फारसे माहित नसलेल्या राहुलना वारंवार चक्रव्यूहात अडकवणारे आपलेच आहेत. त्यांच्यावर मोदी-शहा यांची मेहेरनजर आहे हे लपून राहिलेले नाही.
सहा-सात वर्षांपूर्वी राफेल विमानखरेदीमधील कथित घोटाळ्याचे प्रकरण राहुल यांनी बरेच लावून धरले होते. पण पक्षातील कोणत्याच जबाबदार नेत्याने या मोहिमेत त्यांना साथ दिली नव्हती आणि राहुल यांना एकटे पाडले गेले होते. याउलट तेव्हा ‘ग्रुप ऑफ 23’ (जी-23) असा एक असंतुष्ट मंडळींचा समूह पक्षात निर्माण झाला होता, त्यांनी राहुलवरच वार करायला सुरुवात केली होती. या गटाचे म्होरक्या असणारे गुलाम नबी आझाद हे मोदी यांचे छुपे भक्त आहेत हे आता जगाला कळले आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याचा ताईत झालेला गुलाम नबी आता राजकीयदृष्ट्या जणू विजनवासात गेलेला आहे. पण पक्षाच्या कठीण अवस्थेत त्याने ‘सूर्याजी पिसाळा’चेच काम केले आहे.
काँग्रेसमध्ये असे ‘लहानथोर’ गुलाम नबी आझाद भरलेले आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत. दिल्लीत ते जास्त आहेत कारण तिथे सत्ता आहे. अशावेळी मोदी सरकार आणि भाजपवर धावा बोलणाऱ्या राहुलबरोबर खरोखरच कोण कोण आहे याबाबत शंका यायला जागा आहे. गांधी घराण्याला जेव्हढे अस्थिर ठेऊ तेव्हढे आपल्याला फायदेशीर राहील, असा व्यवहारी विचार करणारेदेखील बरेच काँग्रेसी आहेत. त्यांना पक्ष पुढे जाण्यात स्वारस्य नसून त्यांना त्यांचे दुकान चांगले चालायला पाहिजे आहे. हरियाणात काँग्रेसची हार कशी झाली याबाबत एका समितीमार्फत झाडाझडती सुरु झाली आहे ते चांगलेच आहे. जोपर्यंत खोलात जाऊन गोष्टी बघितल्या गेल्या नाहीत व राजकारण समजून घेतले गेले नाही तर काँग्रेसला परत परत पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. भारत जोडो यात्रेचा अनोखा आणि अवघड प्रयोग करत ‘नफरत की बाजार में मोहोब्बत की दुकान’ राहुल गांधी यांनी काढून पक्षाचे नेतृत्व त्यांनी मिळवलेले आहे. त्यांना आव्हान देणारा आता पक्षात कोणीही नाही.
आता काँग्रेसचा ‘चाल, चरित्र, चेहरा’ कसा बदलावयाचा याबाबत राहुलनी विचार केला पाहिजे. जोपर्यंत काँग्रेस कात टाकत नाही तोवर नवीन आव्हाने कशी पेलावायची हे तिला जमणारे नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी-शहा यांनी पक्ष अतिशय पोखरलेला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेसचे मित्रपक्षच त्याच्या जीवावर उठले आहेत असे वागू लागले आहेत. ज्याप्रकारे समाजवादी पक्ष, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि शिवसेना यांनी विविध कृतीनी अथवा विधानांनी काँग्रेसला बेजार केलेले आहे ते खचितच चांगले नव्हे. काँग्रेस अडचणीत आल्यावर सुरु झालेली ही कोल्हेकुई इंडिया आघाडीला कितपत
मजबूत ठेवू शकते? हा ही वेगळाच प्रश्न आहे.
राहुल गांधींना आता डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा आलेले संकट कशा प्रकारे परतवायचे याबाबत अतिशय धोरणीपणे वागण्याची आवश्यकता आहे. संघटना कशा प्रकारे मजबूत होईल याचा एकीकडे आचारविचार करत असताना भाजपला कसे अडचणीत आणावे याबाबत प्रभावी रणनीती कशी तयार करता येईल यावर खल करावा लागेल. त्याबाबत कोणताही शॉर्टकट चालणार नाही. 1984 साली केवळ दोन जागा लोकसभेत मिळवलेला भाजप आता केंद्रात सत्तेत आहे तो ‘चाल, चरित्र, चेहरा’ बदलल्यानेच. आजच्या घडीला मोदी-शहा यांना कोणा विरोधी नेत्याची भीती वाटत असेल तर तो म्हणजे अखिलेश यादव, ममता बॅनर्जी अथवा अरविंद केजरीवाल नव्हे तर तो नेता म्हणजे राहुल गांधी होत. राहुल यांची ही कमाईच त्यांची पुण्याई आहे. नेता कधी दुसऱ्याला दोष देत नसतो. तो यश तसेच अपयश पचवत असतो. नवीन वातावरणात राहुल काँग्रेसला कसे बुलंद करणार त्यावर भाजपचे भविष्य अवलंबून आहे. राजकारणात कोणीच अमरपट्टा घेऊन आलेला नसतो.
सुनील गाताडे