पांढरा टी-शर्ट घालण्याचे राहुल गांधींचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वसामान्य लोकांच्या अधिकारांचा पुरस्कार करत रविवारी ‘पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट’ मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आणि नरेंद्र मोदी सरकारवर गरीबांची पिळवणूक करण्याचा आरोप केला. जर तुम्ही आर्थिक न्यायावर विश्वास ठेवत असाल आणि संपत्तीच्या वाढत्या असमानतांना विरोध करत असाल, सामाजिक समानतेसाठी लढत असाल, सर्व प्रकारचे भेदभाव अमान्य करत असाल, देशात शांतता अन् स्थैर्यासाठी प्रयत्नशील असाल तर पांढरा टी-शर्ट परिधान करा आणि मोहिमेत सामील व्हा असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
देशात असमानता वाढत आहे. स्वत:च्या रक्त-घामाने देश घडविणाऱ्या कामगारांची स्थिती बिघडत आहे. तसेच विविध प्रकारचे अन्याय आणि अत्याचार सहन करत आहेत. अशास्थितीत त्यांना न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आवाज उठविण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. याच विचारासह आम्ही ‘पांढरा टी-शर्ट मोहीम’ सुरू करत आहोत. युवा आणि मजुरवर्गाच्या सहकाऱ्यांना या मोहिमेत मोठ्या संख्येत भाग घेण्याचे आवाहन करतो असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
तसेच राहुल गांधी यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करत याविषयी विस्तृत माहिती प्राप्त करण्यासाठी एक मोबाइल क्रमांक आणि वेबसाइटची लिंक शेअर केली आहे. व्हाइट टी-शर्ट मूव्हमेंटनुसार पांढरा टी-शर्ट पक्षाच्या पाच मार्गदर्शक तत्वांचे करुणा, एकता, अहिंसा, समानता आणि सर्वांसाठी प्रगतीचे प्रतीक आहे.