राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा 8 सप्टेंबरपासून होणार आहे. तो 10 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांचा हा पहिला विदेश दौरा असेल. या दौऱ्यात ते अमेरिकेतील भारतीय वंशाच्या समाजाशी संवाद साधतील, तसेच अमेरिकेच्या राजकीय नेत्यांशीही संपर्क करतील. ते 8 सप्टेंबरला डल्लास आणि टेक्सास येथे तर 9 आणि 10 सप्टेंबरला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे असतील. या शहरांमध्ये त्यांचे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ते अमेरिकेतील शिक्षणतज्ञ, पत्रकार, विचारवंत, तंत्रज्ञ, उद्योगपती आणि इतर मान्यवरांना भेटणार आहेत. ही माहिती इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोडा यांनी शनिवारी दिली. राहुल गांधी हे आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांचा अमेरिका दौरा आयोजित करावा, अशी मागणी अनेक अमेरिकन भारतीयांनी केल्याने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, असा दावाही पित्रोडा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.