राहूल गांधींहस्ते डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार! डॉ. विश्वजीत कदम यांची माहिती
गुरूवारी पाच सप्टेंबर रोजी वांगी येथे अनावरण: कडेगावात जाहीर मेळावा: 2 लाखांवर उपस्थिती असणार : देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार
सांगली प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यावर उभारण्यात आलेल्या माजी मंत्री स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पाच सप्टेंबरला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जाहीर मेळावा होणार असून या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारती विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व. पतंगराव कदम यांनी आयूष्यभर सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी काम केले. पलूस- कडेगाव तालुक्यासाठी ते भाग्यविधाते होते. भारती विद्यापीठासारखी मोठी संस्था त्यांनी उभी केली. राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी महसूल, उद्योग, वाणिज्य, शिक्षण, वने, सहकार, मदत आाणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली होती. त्याच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून वांगी येथील सोनहिरा साखर कारखान्यावर त्यांचे उचित असे स्मारक उभे केले आहे.
या स्मारकाच्या ठिकाणीच स्व. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला आहे. याचे अनावरण गुरूवारी पाच सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मेळावा होणार आहे. या मेळाव्याला दोन लाख लोक उपस्थित राहतील. पावसामुळे येणाऱ्यांची गैरसोय होरू नये म्हणून मंडपची व्यवस्था देखील केली असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शनच असेल
राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या माहिन्यावर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने राज्यात शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. आ. विश्वजीत कदमांच्या विनंतीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पाच सप्टेंबरला सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यानिमित्ताने काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे.