अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले राहुल गांधी
विमानतळावर झाले मोठे स्वागत
वृत्तसंस्था/ डलास
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वत:च्या तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानिमित्त रविवारी टेक्सासच्या डलास येथे पोहोचले आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि भारतीय वंशाच्या लोकांनी विमानतळावर राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी दोन्ही देशांदरम्यान संबंध मजबूत होण्यासाठी सार्थक चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
डलास, टेक्सास, अमेरिकेत भारतीय स्थलांतरित आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या सदस्यांकडून झालेल्या मोठ्या स्वागतामुळे सुखावलो असल्याचे राहुल गांधी यांनी स्वत:च्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे. सार्थक चर्चा आणि व्यवहार्य संभाषणात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे. या दौऱ्यादरम्यान आमच्या दोन्ही देशांमधील संबंधांना आणखी मजबूत करणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
स्वत:च्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे टेक्सास विद्यापीठासमवेत वॉशिंग्टन आणि डलासमध्ये आयोजित होणाऱ्या बैठकांमध्ये सामील होतील. लोकसभेत विरोधी पक्षनेता झाल्यावर राहुल गांधींचा हा पहिला अमेरिका ादैरा असल्याचे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून भारतीय समुदायाशी संबंधित राजनयिक, शिक्षणतज्ञ, उद्योजक, नेते आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 8-10 सप्टेंबर या अत्यंत छोट्या कालावधीच्या दौऱ्यावर आले असल्याचे पित्रोदा यांनी सांगितले आहे.
8 सप्टेंबर रोजी राहुल गांधी हे डलास येथेच असतील. तर 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ते वॉशिंग्टन डीसी येथे असणार आहेत. डलासमध्ये टेक्सास विद्यापीठाच्या विद्यार्थी, शिक्षणतज्ञ आणि भारतीय समुदायाच्या लोकांच्यासोबत चर्चा केली जाईल. एक अत्यंत मोठी सामूहिक सभा देखील आयोजित होणार आहे. तसेच काही तंत्रज्ञांना राहुल गांधी भेटणारआहेत. मग डलासच्या क्षेत्रीय नेत्यांसोबत राहुल गांधी हे प्रीतिभोजनात सामील होतील अशी माहिती पित्रोदा यांनी दिली.
वॉशिंग्टन डीसीमध्ये राहुल गांधी हे थिंक टँक, नॅशनल प्रेस क्लब आणि अन्य लोकांसमवेत चर्चा करणार आहेत. आम्ही अत्यंत यशस्वी दौऱ्याची अपेक्षा करत आहोत असे उद्गारही त्यांनी काढले आहेत.