कोळसावाहू मजुरांशी राहुल गांधींनी साधला संवाद! सायकलवरून केला प्रवास
झारखंडमध्ये सायकलवरून केला प्रवास : जाणून घेतली कमाई
वृत्तसंस्था/ रांची
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या झारखंडची राजधानी रांची येथे दाखल झाली आहे. राहुल गांधी हे 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या पाकुड येथे पोहोचले होते, जेथून धनबाद, बोकारो आणि रामगढमार्गे ते रांचीत दाखल झाले आहेत. रामगढ येथून रांचीसाठी प्रवास करताना राहुल यांनी मार्गात कोळसा वाहून नेणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या कमाईविषयी जाणून घेतले आहे. याचबरोबर रांचीमध्ये राहुल यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांची भेट घेत चर्चा केली आहे. सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. एकजूट होत न्यायासाठी लढाई सुरूच ठेवणार असल्याचे राहुल यांनी यावेळी म्हटले आहे. सायकलवरून 200-200 किलो कोळसा घेऊन दररोज 30-40 किलोमीटर प्रवास करणाऱ्या या युवकांचे उत्पन्न नाममात्र आहे.
या युवकांसोबत चालल्याशिवाय त्यांचा भार अनुभवल्याशिवाय त्यांच्या समस्या जाणून घेता येत नाहीत. या युवा श्रमिकांची जीवनगाडी मंदावली तर भारत निर्माणाचे चक्र देखील थांबणार असल्याचे राहुल यांनी स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. रांचीमध्ये राहुल यांच्या स्वागतासाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. रांचीतील चुत्तुपलू व्हॅलीतील हुतात्मास्थळाला भेट देत राहुल यांनी हुतात्मा टिकैत उमराव सिंह आणि शेख भिखारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी इंदिरा गांधी हँडलूम प्रोसेस मैदानात विणकरांशी संवाद साधला आहे. तसेच रांची येथील एका जाहीरसभेला त्यांनी संबोधित केले आहे.