राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त ’राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ कार्यक्रम
बेळगाव : ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, घनु वाजे रुणझुणा, ते कानडा राजा पंढरीचा, अशा एकाहून एक सरस गीतांच्या सादरीकरणाने राहुल देशपांडे यांनी रसिकांची रविवारची संध्याकाळ स्मरणीय केली. ‘श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थे’च्यावतीने महिला दिनाच्या निमित्ताने ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘गणाधीश लॉन’ येथे झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रारंभी ‘श्री महिला’च्या चेअरपर्सन प्रतिभा दडकर व सर्व संचालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सीईओ तन्वी वेलंगी यांनी स्वागत केले. राजू नाईक यांनी सूत्रसंचालन केले.यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करताना राहुल यांनी ‘देव देव्हाऱ्यात नाही, घनु वाजे रुणझुणा, तरुण आहे रात्र अजुनी ही गिते सादर केली. त्यानंतर दीप्ती माटे यांनी ‘सिली हवा, तुम्हावर केली मी मर्जी बहाल व जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ही गाणी सादर केली. मध्यंतरानंतर ‘श्री महिला’च्या सुवर्ण कर्ज योजनेचे अनावरण करण्यात आले. प्रतिभा दडकर यांच्या हस्ते राहुल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर पुन्हा राहुल मंचावर आले. त्यांनी ‘सांज ढले, गगन तले, मरीज ए इश्क, हम बेवफा, कोई फरियाद, कैवल्य गान, कंठात आर्त ओळी’ ही गीते सादर केली. आपल्या ‘कलेक्टिव्ह’ या उपक्रमाबद्दल ते म्हणाले, कोरोना काळात आपण सतत रियाज सुरू ठेवला. याच दरम्यान काही वेगळे करता येईल का, असा विचार करून हृदयनाथ आणि लता मंगेशकर यांची गाणी यु ट्यूबवर सादर केली. अचानक एक दिवस हृदयनाथ यांचा फोन आला. खरे तर ते काय म्हणतील याचे दडपण आले होते. मात्र, हृदयनाथ यांनी ‘तुम्हाला समजले आहे, तुम्ही काय करता ते, हा उपक्रम सुरू ठेवा, असे सांगितले. आणि एक संगीतकार, गायक म्हणून मी प्रगल्भ झालो, खूप गोष्टी शिकू लागलो, असे नमूद करून विशाल भारद्वाज यांचे ‘पानी पानी रे’ हे गीत ऐकून रेखा भारद्वाज यांनी विशाल तुम्हाला भेटू इच्छितात, असे सांगितले. या भेटीची आठवण सांगून राहुल यांनी ‘पानी पानी रे’ हे गीत सादर केले. ‘कानडा राजा पंढरीचा’ गीताने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. या गीताने भारावलेल्या रसिकांना कार्यक्रम संपू नये, असेच वाटत राहिले, आणि हेच कार्यक्रमाचे यश ठरले. राहुल यांना की बोर्डवर विशाल धुमाळ, तबल्यावर प्रसाद पाध्ये, संवादिनीवर आदित्य ओक, ऑक्टोपॅडवर रोहन वनगे व बेस गिटारवर मनीष कुलकर्णी यांनी अप्रतिम साथ केली. या साथीदारांच्या वादनामुळे कार्यक्रमाची उंची अधिक वाढली. रसिकांच्या सोयीसाठी एलईडी स्क्रिनही लावली होती.