राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर
अर्चना मजुमदार यांची सदस्य म्हणून नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल. रहाटकर यापूर्वी 2016 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांची सामाजिक कार्यातील भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्यावरील भेदभाव आणि हिंसाचार दूर करणे आणि त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे हे राष्ट्रीय महिला आयोगाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, रहाटकर यांची या पदावर तीन वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत (जे आधीचे असेल) नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आयोगाच्या नवव्या अध्यक्षा असतील. महाराष्ट्र-झारखंडमधील विधानसभा निवडणूक आणि राजस्थानमधील सात जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी विजया रहाटकर यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रहाटकर या महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील आहेत. याआधी त्या राजस्थानमध्ये भाजपच्या सहप्रभारी होत्या. अशा स्थितीत पक्षाने एकाच दगडात अनेक लक्ष्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजप महिलांना योग्य आदर देत असल्याचा संदेश मतदारांना जाऊ शकतो.
रहाटकर या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. तसेच सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर आता महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या कार्यकाळात त्यांनी सक्षमा (अॅसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी), प्रज्ज्वला (केंद्र सरकारच्या योजनांशी स्वयं-मदत गट जोडण्यासाठी) आणि सुहिता (महिलांसाठी 24×7 हेल्पलाईन सेवा) सारख्या कल्याणकारी उपक्रम राबविले. याशिवाय, त्यांनी पॉक्सो कायदा, तिहेरी तलाकविरोधी सेल आणि मानवी तस्करीविरोधी युनिटवर लक्ष केंद्रित करून लैंगिक सुधारणांवरही काम केले. त्याव्यतिरिक्त डिजिटल साक्षरता कार्यक्रम सुरू करतानाच महिलांच्या प्रश्नांना वाहिलेले ‘साद’ नावाचे प्रकाशनही सुरू केले. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीय कायदा पुरस्कार आणि राष्ट्रीय साहित्य परिषदेच्या सावित्रीबाई फुले पुरस्काराचा समावेश आहे.
राजकीय-सामाजिक कारकीर्द
अत्यंत तळागाळापासून काम सुरू करून महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती.