रहाणे-श्रेयस फ्लॉप, मुंबई ऑलआऊट 224
होम ग्राऊंडवर मुंबईचे फलंदाज ढेपाळले : शार्दुल ठाकुरच्या सर्वाधिक 75 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी चषकाच्या अंतिम फेरीत विदर्भविरुद्ध मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर गडगडला. शार्दुल ठाकुर व पृथ्वी शॉ वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने घरच्या मैदानावर मुंबईचे खराब प्रदर्शन राहिले. विशेष म्हणजे, दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे अंतिम सामन्यात पुन्हा फ्लॉप ठरले. विदर्भाच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली असून दिवसअखेरीस 13 षटकांत 3 बाद 31 धावा केल्या आहेत. अद्याप ते 193 धावांनी पिछाडीवर असून अथर्व तायडे 21 व आदित्य ठाकरे 0 धावांवर खेळत होते.
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर हिरवे गवत असल्याने विदर्भने नाणेफेक जिंकल्यावर मुंबईला प्रथम फलंदाजी देणे स्वाभाविक होते. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलामीवीर पृथ्वी शॉ आणि भूपेन ललवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. या जोडीने काही उत्तम फटकेही मारले. पण भूपेन ललवानीला 37 धावांवर बाद करत यश ठाकूरने ही जोडी फोडली. यानंतर पाठोपाठ पृथ्वी शॉला हर्ष दुबेने क्लीन बोल्ड केले. पृथ्वीने 5 चौकारासह 46 धावांचे योगदान दिले. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर अवघ्या 22 धावांत मुंबईने चार विकेट्स गमावल्या. यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेला मुशीर खान सहा धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार रहाणे आणि श्रेयस अय्यर सात धावा करून बाद झाले. हार्दिक तमोरेला पाच धावा करता आल्या तर शम्स मुलानी 13 धावा करून तंबूत परतला.
एकट्या शार्दुलच्या 75 धावा
घरच्या मैदानावर खेळताना मुंबईचे दिग्गज फलंदाज माघारी परतत असताना एकट्या शार्दुल ठाकुरने मात्र किल्ला लढवला. शार्दुलने मुंबईच्या बुडत्या डावाला सावरण्याचे काम केले. एकवेळ मुंबईने 111 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शार्दुलने 69 चेंडूंचा सामना करत 75 धावा केल्या. शार्दुलच्या या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शार्दुलच्या या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार केला. तनुष कोटियान 8 तर तुषार देशपांडे 14 धावा करुन बाद झाले. शार्दुल 75 धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईचा पहिला डाव 64.3 षटकांत 224 धावांवर संपला. विदर्भाकडून यश ठाकुर आणि हर्ष दुबे यांनी भेदक गोलंदाजी करताना 3-3 बळी घेतले. उमेश यादवलाही दोन बळी मिळाले.
विदर्भ 193 धावांनी पिछाडीवर
मुंबईला ऑलआऊट करुन बॅटिंगसाठी आलेल्या विदर्भाला शार्दुल ठाकुरने पहिलाच झटका दिला. शार्दुलने ध्रुव र्शेरेला भोपळाही फोडू दिला नाही. यानंतर धवल कुलकर्णीने लागोपाठ दोन विकेट घेत विदर्भाला चांगलाच दणका दिला. विदर्भाने 4 धावांमध्ये 2 विकेट्स गमावल्या. धवलने अमन मोखाडेला 8 आणि करुन नायरला झिरोवर आऊट केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 13 षटकांत 3 गडी गमावत 31 धावा केल्या असून अद्याप ते 193 धावांनी पिछाडीवर आहेत. दिवसअखेरीस अथर्व तायडे (21) आणि आदित्य ठाकरे (0) नाबाद आहेत.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव सर्वबाद 224 (पृथ्वी शॉ 46, भूपेन ललवाणी 37, शार्दुल ठाकुर 75, तुषार देशपांडे 14, हर्ष दुबे व यश ठाकुर प्रत्येकी तीन बळी).
विदर्भ पहिला डाव 13 षटकांत 3 बाद 31 (अथर्व तायडे खेळत आहे 21, ध्रुव शोरे 0, अमन मोखडे 8, करुण नायर 0, शार्दुल ठाकुर 1 तर धवल कुलकर्णी दोन बळी).
रहाणे-श्रेयस पुन्हा फ्लॉप
पूर्ण मोसमात चाचपडत असलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी आजचा दिवसही वेगळा नव्हता. सात धावांसाठी त्याने 35 चेंडूंचा सामना केला. अखेर उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात त्यानेही विकेट बहाल केली. बीसीसीआयच्या वार्षिक करारातून बाहेर पडल्यानंतर रणजी चषकात खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने सपशेल निराशा केली. अंतिम लढतीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण अवघ्या 7 धावा काढून तो बाद झाला.
मुंबईच्या खराब कामगिरीनंतर मास्टर ब्लास्टरची नाराजी
रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पहिल्याच दिवशी विदर्भासमोर मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. होम ग्राऊंडवर खेळताना मुंबईकडून खरे तर चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण त्यांचा डाव अवघ्या 224 धावांवर संपला. मुंबईच्या या खराब कामगिरीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाराजी व्यक्त केली आहे. सचिन म्हणाला की, चांगली सुरुवात मिळूनही मुंबईचे फलंदाज अतिशय सामान्य क्रिकेट खेळले. याउलट विदर्भाने मात्र मुंबईवर दबाव कायम ठेवला. विकेटवर ज्या प्रकारे गवत दिसत आहे, परंतु जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा चेंडू अधिक वळेल आणि फिरकी गोलंदाजांना खूप मदत होईल. यामुळे सामना निश्चितच रोमांचक होईल.