रहाणे-शॉची तुफानी खेळी, मुंबई सेमीफायनलमध्ये
विदर्भावर 6 गडी राखून मात : उपांत्य लढतीत बडोद्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ अलूर (केरळ)
अजिंक्य रहाणे-पृथ्वी शॉची बेधडक सुरुवात, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगेच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने विदर्भ संघावर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे. गुरुवारी मुंबई व विदर्भ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने 221 धावांचा डोंगर उभारला. यानंतर मुंबईच्या या विजयात अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉची सुरुवात निर्णायक ठरली. या दोघांनी 6 षटकांत 82 धावा केल्या आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला. आता, उपांत्य फेरीत मुंबईची लढत बडोद्याशी होईल.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाची सुरुवात चांगली झाली. करुण नायर आणि अथर्व तायडे यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची सलामी दिली. नायर 15 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. यानंतर 65 धावांवर संघाला दुसरा धक्का बसला. पार्थ रेखाडे स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर तायडे आणि अपूर्व वानखेडे यांनी मोर्चा सांभाळत मुंबईच्या गोलंदाजांना धारेवर धरले. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 140 च्या पुढे नेली. तायडेने अर्धशतकी खेळी साकारताना 41 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. वानखेडेनेही 33 चेंडूत 51 धावा फटकावल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर अखेरच्या काही षटकांत शुभम दुबेने स्फोटक शैलीत फलंदाजी करत 19 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर विदर्भाने 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या.
रहाणे-पृथ्वी शॉ कडून धुलाई
मुंबईकडून अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ जोडी फलंदाजीला उतरली. पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच आपल्या जुन्या फॉर्मत परतल्याचे दिसून आले. त्याने 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 26 चेंडूत 49 धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर वादळी फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेचे थोडक्यासाठी शतक हुकले. रहाणेने 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 45 चेंडू 84 धावांची मॅच विनिंग खेळी केली. दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या महत्त्वाच्या सामन्यात फेल ठरले. यानंतर शिवम दुबे (नाबाद 37) आणि सूर्यांश शेडगे (नाबाद 36) यांनी चांगली भागीदारी रचत मुंबईला चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला.
पश्चिम बंगालला नमवत बडोदा उपांत्य फेरीत
बेंगळूर : सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत पश्चिम बंगाल व बडोदा यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला गेला. या सामन्यात बडोद्याने 41 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. प्रथम फलंदाजी करताना संघाने 7 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात, बंगालचा संघ 131 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाची सुरुवात चांगली झाली. शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. रावत 26 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. या महत्वपूर्ण सामन्यात हार्दिक पंड्या केवळ 10 धावा काढून माघारी परतला. त्याचा मोठा भाऊ आणि कर्णधार कृणाल पंड्याची बॅटही शांत राहिली. तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवालिक शर्मानं 24 धावांचे योगदान दिले. विष्णू सोलंकी 16 धावांवर नाबाद राहिला. बडोदा संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे चार प्रमुख फलंदाज अवघ्या 31 धावांवर बाद झाले. या सामन्यात बंगालचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. संघाकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक 36 चेंडूत 55 धावा केल्या. इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे बंगालचा संपूर्ण संघ 18 षटकांत 131 धावांत गारद झाला. बडोद्यासाठी हार्दिक पंड्याने अप्रतिम गोलंदाजी करत 3 बळी घेतले आणि तीन झेलही घेतले.
मध्य प्रदेश-दिल्लीत रंगणार दुसरा उपांत्य सामना
सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील अन्य सामन्यात मध्य प्रदेशने सौराष्ट्राचा 6 विकेट्सने तर दिल्लीने उत्तर प्रदेशचा 19 धावांनी पराभव केला. आता, मध्य प्रदेश व दिल्लीत दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. हा सामना बेंगळूर येथे खेळवण्यात येईल.