Radhanagari Dam Update: धरणाचे सर्व्हिस गेट बंद, 33 दिवसांत 9 TMC पाण्याचा विसर्ग
धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यात जलसंपदा विभागाला यश आलंय
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी धरणातील पाणीसाठा आणि पावसाळ्यातील पाण्याची संभाव्य वाढ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उघडण्यात आलेले राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अखेर बंद करण्यात आले आहे. ३३ दिवस धरणातून सुरू असलेल्या विसर्गाद्वारे तब्बल ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात आला. यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे.
सध्या धरणातून १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वीज निर्मिती केंद्रातून सुरू आहे. याआधी हे सर्व्हिस गेट उघडे असताना दररोज ३१०० क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात येत होता. यावर्षी मे व जून महिन्यात पावसाळ्यापूर्वीच धरण ५० टक्के भरले होते, आणि १ जूनपासून धरण तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने अतिवृष्टी सुरू होती.
त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली. सर्व्हिस गेट वेळेवर उघडले नसते, तर धरण जूनअखेरीसच पूर्ण क्षमतेने भरले असते. संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे सध्या धरण 92 टक्के भरले असून लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
राधानगरी धरणास वक्रद्वार व्यवस्था नसल्याने, टप्प्याटप्प्याने साठा कमी करण्यासाठी सर्व्हिस गेटचा वापर करावा लागतो. धरण पूर्ण भरल्यावरच स्वयंचलित दरवाजे उघडतात, त्यामुळे आधीच नियोजन करून पाणीसाठा नियंत्रित करणे फार आव्हनात्मक असते.
धरणाच्या सुरक्षेच्या व संभाव्य पूर परिस्थिती टाळण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल पूराच्या पाण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्णायक ठरले. त्यामुळे उर्वरित पावसाळी हंगामात पाणीसाठ्याचे व्यवस्थापन अधिक नियोजनबद्धपणे करता येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.