राधानगरी धरण भरले 90 टक्के! तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम,1500 क्यूसेकने विसर्ग सुरू
राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, असाच पावसाचा जोर राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे, गेल्या वर्षी 26 जुलै रोजी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 137 मी मी नोंदला असून आजतागायत 2554 मी मी पावसाची नोंद झाली आहे,मंगळवारी दुपारी 12 वाजता पाणी पातळी342.56फूट, व पाणीसाठा 7443.99 द ल घ फू, इतका आहे, अद्यापही धरण भरण्यास पाच फूट पाणी कमी असून येत्या दोन दिवसात कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे खुले होऊ शकतात, सध्या धरणातून खाजगी जलविद्युत केंद्रातून 1500 क्यूसेकने विसर्ग सुरू असून ओढे नाले तुडूंब वाहू लागल्याने भोगावती नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे