प्रतापसिंहनगरात राडा ; पोलिसांनी केला लाठीचार्ज
पैशाच्या कारणावरुन वाद झाल्याची प्राथमिक माहिती : सुरुवातीला धक्काबुक्की नंतर हाणामारी, पोलिसांनी मतदान केंद्राचे गेट केले बंद, वाद निवळताच मतदान पेट्या नेल्या
सातारा : सातारा शहरातील प्रतापसिंहनगरात मतदानादिवशी पैशाच्या कारणावरुन दोघांच्यात वाद सुरु झाला. या वादात धक्काबुक्की होताच हाणामारीला सुरुवात झाली. हा बाब सातारा पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद वाढल्याने त्यांनी लाठीचार्ज केला. यावेळी मतदान केंद्राचे गेट काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. प्रतापसिंहनगरातील मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत होती. तोच सायंकाळी दोघांच्यात पैशावरुन वाद सुरु झाला. हा वाद बघून दोघांच्या बाजूने रहिवाश्यांनी गर्दी केली.
दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करताच ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा वाद वाढून एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात झाली. या घटनेची माहिती मिळताच सातारा शाहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्केनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाद शांत करण्याचा प्रयत्न करुनही रहिवाशी ऐकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. सगळे पळून जायला लागले. काही जण मतदान केंद्रात गेले. हे पाहून केंद्राचे गेट बंद करण्यास पोलीस निरीक्षक मस्के यांनी सूचना केल्या. यामुळे मतदान पेट्या उशिरा हलवण्यात आल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हे दाखल झालेला नव्हता.