मतदानासाठी अमेरिकेतून थेट कोल्हापुरात
कोल्हापूर :
लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याचे भान राखत अमेरिकेत स्थायिक असलेल्या झरना वरूण मेहता-वोरा यांनी कोल्हापुरात येऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला. त्यांचे पती वरूण वोरा (रा. मुंबई) यांनीही मतदानासाठी मायदेशात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले आहे.
कोल्हापुरातील प्रतिभानगर विश्वकर्मा पार्क येथे राहणारे प्रकाश मेहता यांची कन्या झरना यांचे लग्न मुंबईतील वरूण वोरा यांच्याशी झाले आहे. दोघेही पतीपत्नी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका मोठ्या खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
नोकरीनिमित्त ते दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच त्यांनी मतदानासाठी कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघेही मतदानाच्या चार दिवस अगोदरच अमेरिकेतून थेट मायदेशात परतले. झरना या कोल्हापुरातील आपल्या माहेरी आल्या तर त्यांचे पती वरूण हे मुंबईत थांबले. दोघांनीही बुधवारी मतदानाचा पवित्र हक्क बजावत समाजसमोर आदर्श निर्माण केला आहे.
एरव्ही मतदानाचे केंद्र घरापासून काही अंतरावर असतानाही काहीजण मतदान करत नाहीत. तर काहीजण मतदानाच्या सुट्टीदिवशी अन्य कामे करतात व मतदानाकडे दुर्लक्ष करतात. जिल्हा प्रशासनाकडूनही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानाच्या महिनाभर आगोदर अनेक उपक्रम राबविले जातात. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खेडोपाडी, गावोगावी, प्रत्येक चौकात जनजागृती केली जाते. तरीही मतदानाचा टक्का म्हणावा तसा वाढत नाही. पण झरणा व वरूण यांनी अमेरिकेतून मायदेशात येऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकटीसाठी प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन केले.