ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला
शिविगाळासह बेशुद्ध होईपर्यंत मारहाण : पत्नीच्या समोरच घडला प्रकार
वृत्तसंस्था/ अॅडलेड
ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड शहरात एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला झाला आहे. चरणप्रीत सिंह हा पत्नीसोबत कारने शहरातील लाइट शो पाहण्यासाठी बाहेर पडला असताना हा हल्ला झाला आहे. शहराच्या किंटोर एव्हेन्यूनजीक रात्रीच्या वेळी पार्किंगवरून त्याचा स्थानिक लोकांसोबत वाद झाला होता. या वादानंतर स्थानिक युवकांनी चरणप्रीतला वर्णद्वेषी शिविगाळ करत मारहाण केली आहे.
भारतीय पळून जा असे म्हणत स्थानिक युवकांनी लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली होती. मी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी मी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. अशाप्रकारच्या घटना घडल्यावर मायदेशी परतण्याचा विचार मनात येतो. आम्ही आमच्या शरीरात काहीही बदलू शकतो, परंतु स्वत:चा रंग बदलू शकत नाही असे चरणप्रीतने सांगितले आहे. याप्रकरणी एफआयआर नेंदवत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
व्हिडिओ व्हायरल
या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात 5 लोक चरणप्रीतला मारहाण करताना दिसून येतात. तर चरणप्रीतची पत्नी या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत होती असे या व्हिडिओतून समोर आले आहे. हल्लेखोरांच्या हातात टोकदार वस्तू होती. हल्ला केल्यावर आरोपी स्वत:च्या कारमधून तेथून पसार झाले. या हल्ल्यात चरणप्रीत गंभीर जखमी झाला असून त्याला रॉयल अॅडलेड रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी 20 वर्षीय इसमाला एनफील्ड येथून अटक करण्यात आल्याचे सांगत पोलिसांनी अन्य आरोपींना पकडण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे.
चरणप्रीतच्या समर्थनार्थ लोक सरसावले
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चरणप्रीत जमिनीवर बेशुद्ध पडला होता, त्याला रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. याप्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे. वर्णद्वेषाच्या या घटनेनंतर अॅडलेड येथील भारतीय समुदायात संताप पसरला असून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षेवरून चिंता वाढली आहे. चरणप्रतीच्या समर्थनार्थ अनेक लोक सरसावले असून वर्णद्वेषी हिंसेच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर पीटर मालिनौस्कस यांनी या हल्ल्याची निंदा करत वर्णद्वेषी हल्ले पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे वक्तव्य केले आहे.