ऑस्ट्रेलियातील मंदिरावर वांशिक हल्ला
स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर लिहिले द्वेषपूर्ण संदेश : भारतीय समुदायात संताप, एकतेचे आवाहन
वृत्तसंस्था/मेलबर्न
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात वांशिक द्वेषाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील बोरोनिया भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर अपशब्द आणि वांशिक द्वेषपूर्ण भाषेतील संदेश लिहिण्यात आले आहेत. या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न अज्ञात लोकांनी केला. दरम्यान, व्हिक्टोरिया पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत आहेत. या घटनेनंतर हिंदू आणि बहुसांस्कृतिक संघटनांनी एकत्र येऊन द्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. स्थानिक समुदाय आणि ‘सिटी ऑफ ग्रेटर नॉक्स’च्या मल्टीफेथ नेटवर्कने मंदिराला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
ही घटना केवळ धार्मिक स्थळावरील हल्ला नाही तर भारतीय समुदायाच्या भावनांवर थेट हल्ला असल्याचा दावा हिंदू समुदायाकडून करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तसंस्था ‘ऑस्ट्रेलिया टुडे’नुसार, मंदिराच्या भिंतीवर लाल रंगात ‘गो होम ब्राउन...’ असे द्वेषपूर्ण वांशिक शब्द लिहिलेले होते. इतकेच नाही तर जवळच्या दोन आशियाई रेस्टॉरंट्सच्या भिंतींवरही अशाच आशयाचे अपशब्द आढळून आले आहेत. हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया (व्हिक्टोरिया चॅप्टर) चे अध्यक्ष मकरंद भागवत यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. हे मंदिर शांती, भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. मात्र, काही लोक द्वेष पसरवून आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि अस्मितेवर हल्ला करत असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.
व्हिक्टोरियाच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश
व्हिक्टोरियाच्या मुख्यमंत्री जॅसिंटा अॅलन यांनी अद्याप या घटनेचा जाहीर निषेध केलेला नसला तरी, त्यांच्या कार्यालयाने मंदिर व्यवस्थापनाला वैयक्तिक संदेश पाठवला आहे. त्यांनी हे द्वेषपूर्ण, वंशवादी आणि भीती निर्माण करणारे कृत्य असल्याचे वर्णन केले.