रचिनचे शतक अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये
बांगलादेशसह पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात : किवीज संघाचा पाच गडी राखून विजय
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
युवा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रचे शानदार शतक, टॉम लॅथमच्या अर्धशतकी खेळी व अष्टपैलू मायकेल ब्रेसवलच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला 9 बाद 236 धावापर्यंत मजल मारता आली. यानंतर किवीज संघाने विजयी लक्ष्य 46.1 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील दुसरा विजय असून या विजयासह त्यांनी आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशसह पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडचा तिसरा व शेवटचा सामना दि. 2 रोजी भारताविरुद्ध होईल.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किवीज संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विल यंगला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार केन विल्यम्सन 5 धावा काढून बाद झाला. अनुभवी डेव्हॉन कॉनवेही 30 धावा काढून बाद झाल्याने किवीज संघ अडचणीत सापडला होता.
रचिन रवींद्रचे शतक
अडचणीत सापडलेल्या किवीज संघाचा डाव चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या रचिन रवींद्रने सावरला. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिरंगी मालिकेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना रवींद्रला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो रक्तबंबाळही झाला होता. यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. पण, दुखापतीतून जोरदार कमबॅक करताना रवींद्रने वनडेतील चौथे शतक साजरे केले. त्याने 105 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह 112 धावा केल्या. याशिवाय, टॉम लॅथमसोबत त्याने चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. शतकानंतर मात्र रवींद्र 112 धावांवर बाद झाला. लॅथमने 3 चौकारासह 55 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स (नाबाद 21) व ब्रेसवेल (नाबाद 11) धावा करत संघाला 47.1 व्या षटकांत विजय मिळवून दिला.
बांगलादेशचे आव्हान संपुष्टात
रावळपिंडीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली व प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी अचूक मारा करत आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागलेल्या बांगलादेशच्या डावाची सुरुवात या सामन्यातही खराब झाली. सलामीवीर तंजिद हसन व नजमूल शांतो यांनी 45 धावांची सलामी दिली, पण 24 धावांवर तंजिदला ब्रेसवेलने बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. मेहिदी हसन मिराज (13), तौहिद हदोय (7), मुशफिकुर रहीम (2), मेहमुदुल्लाह (4) या मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजांनी निराशा केल्याने बांगलादेशची 5 बाद 118 अशी स्थिती झाली होती.
कर्णधार शांतोचे अर्धशतक
या बिकट स्थितीत एका बाजूला विकेट पडत असताना बांगलादेशचा कर्णधार शांतोने दमदार अर्धशतक झळकावले. शांतोने जाकेर अलीला सोबतीला घेत सहाव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी साकारली. यादरम्यान, त्याने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 9 चौकारासह 77 धावांचे योगदान दिले. या सामन्यात शतकी खेळी साधेल असे वाटत होते, पण 77 धावांवर तो बाद झाला. विशेष म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफीत अर्धशतक झळकावणारा तो बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला. त्याला जाकेर अलीने 55 चेंडूत 45 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर रिशाद होसेनने 25 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 26 धावांची खेळी करत संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. इतर तळाच्या फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने बांगलादेशला 50 षटकांत 9 बाद 236 धावापर्यंत मजल मारता आली.
न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. ब्रेसवेलने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 26 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. ओरुकेने दोघांना बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 50 षटकांत 9 बाद 236 (तंजिद हसन 24, नजमूल शांतो 77, मेहिदी हसन मिराज 13, जाकेर अली 45, रिशाद होसेन 26, तस्कीन अहमद 22, मायकेल ब्रेसवेल 26 धावांत 4 बळी, ओरुके 2 बळी, मॅट हेन्री व जेमिसन प्रत्येकी एक बळी).
न्यूझीलंड 46.1 षटकांत 5 बाद 240 (विल यंग 0, कॉनवे 30, केन विल्यम्सन 5, रचिन रवींद्र 112, टॉम लॅथम 55, ग्लेन फिलिप्स नाबाद 21, ब्रेसवेल नाबाद 11, तस्कीन अहमद, मुस्तफिजूर रेहमान, रिशाद होसेन प्रत्येकी एक बळी).