रचिन रवींद्रचे तीन बळी : स्वेर्टचे नाबाद अर्धशतक
दुसरी कसोटी पहिला दिवस : द.आफ्रिका 6 बाद 220
वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील मंगळवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 6 बाद 220 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे स्वेर्टने नाबाद अर्धशतक (55) झळकविले. न्यूझीलंडतर्फे रचिन रवींद्रने 33 धावात 3 गडी बाद केले.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. डावातील दुसऱ्याच षटकात सलामीचा फॉर्च्युइन खाते उघडण्यापूर्वीच हेन्रीच्या गोलंदाजीवर फिलिप्सकरवी झेलबाद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाना फटकेबाजीपासून रोखले. न्यूझीलंडच्या ओरुरकेने कर्णधार निल ब्रँडला पायचीत केले. त्याने 38 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावा जमविल्या. वेग्नरने वॅन टोंडेरला लॅथमकरवी झेलबाद केले. त्याने 71 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. उपाहारावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 27 षटकात 3 बाद 64 अशी होती.
खेळाच्या दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने आणखी 2 गडी गमविताना 63 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेचे अर्धशतक 110 चेंडूत तर शतक 276 चेंडूत नोंदविले गेले. उपाहारानंतर हमजा चौथ्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. रचिन रवींद्रने हमजाला बदली खेळाडू सँटेनरकरवी झेलबाद केले. त्याने 99 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना किगेन पिटरसनला केवळ 2 धावावर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेने आपला निम्मा संघ 101 धावात गमविला होता. चहापानावेळी दक्षिण आफ्रिकेने 56 षटकात 5 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली होती. बेडिंगहॅम 25 तर स्वेर्ट 16 धावांवर खेळत होते.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेने एकमेव फलंदाज गमविताना 93 धावा जमविल्या. रचिन रवींद्रने डेविड बेडिंगहॅमला यंगकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 102 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावा जमविताना स्वेर्टसमवेत सहाव्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. बेडिंगहम बाद झाल्यानंतर स्वेर्टला व्हॉनबर्गकडून चांगलीच साथ मिळाली. या जोडीने दिवसअखेर सातव्या गड्यासाठी अभेद्य 70 धावांची भागिदारी केली. स्वेर्टने 115 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने 6 बाद 220 धावा जमविल्या. स्वेर्ट 135 चेंडूत 9 चौकारांसह 55 तर व्हॉनबर्ग 82 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे द्विशतक 485 चेंडूत नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे रचिन रवींद्रने 33 धावात 3 तर मॅट हेन्री, ओरुरकी आणि वेग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी यापूर्वी घेतली आहे. आता न्यूझीलंडला पहिल्यांदाच कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्याची संधी लाभली असून त्यांना ही कसोटी अनिर्णीत राखणे किंवा जिंकणे गरजेचे आहे.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प. डाव 89 षटकात 6 बाद 220 (ब्रँड 25, फॉर्च्युइन 0, व्हॅन टोंडेर 32, हमजा 20, बेडिंगहॅम 39, पिटरसन 2, स्वेर्ट खेळत आहे 55, व्हॉनबर्ग खेळत आहे 34, अवांतर 13, रचिन रवींद्र 3-33, हेन्री 1-44, ओरुरकी 1-47, वेग्नर 1-32).