रचिन रवींद्र, टॉम लॅथम यांची शतकांसह द्विशतकी भागीदारी
विंडीजविरुद्ध पहिली कसोटी, तिसरा दिवस : 481 धावांची आघाडी घेत न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड
वृत्तसंस्था/ख्राईस्टचर्च
रचिन रवींद्र व कर्णधार टॉम लॅथम यांनी झळकवलेल्या शानदार शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळविले. रवींद्रने 176 तर लॅथमने 145 धावा जमविल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर 4 बाद 417 धावा जमवित विंडीजवर एकूण 481 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 231 धावा जमविल्यानंतर विंडीजचा पहिला डाव केवळ 167 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात बिनबाद 32 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळास पुढे प्रारंभ केला आणि दिवसभरात 4 गड्यांच्या बदल्यात 385 धावांची भर घातली. रवींद्रने लॅथमसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 279 धावांची भागीदारीड केली. दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात दोघेही बाद झाले. रवींद्रने 185 चेंडूत 27 चौकार, एक षटकारासह 176 धावा फटकावल्या तर लॅथमने 250 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 145 धावा जमविल्या. न्यूझीलंडने जमविलेल्या 417 पैकी 200 धावा 50 चौकारांनी झाल्या, त्यात रवींद्रने एकट्याने 27 चौकार मारले.
दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा विल यंग 20 व मायकेल ब्रेसवेल 6 धावांवर खेळत होते. चौथ्या दिवशी न्यूझीलंड डाव घोषित करण्याची अपेक्षा आहे. लॅथमने संयमी खेळी करीत अखेरच्या टप्प्यापर्यंत मैदानावर होता. त्याने गेल्या तीन वर्षातील 40 डावांनंतर पहिले शतक नोंदवले. 179 चेंडूत त्याने हे शतक 9 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याचे हे एकूण 14 वे कसोटी शतक आहे. पहिल्या डावातही त्याने संथ खेळत 85 चेंडूत 24 धावा जमविल्या होत्या. याउलट आक्रमक खेळणाऱ्या रवींद्रने चौथे व सलग दुसरे कसोटी शतक 108 चेंडूत 16 चौकार, एक षटकारासह पूर्ण केले. लॅथम व कॉनवे (37) यांनी 84 धावांची सलामी दिली. पण नंतर केन विल्यमसन 9 धावा काढून उपाहाराआधी बाद झाल्यानंतर त्यांची स्थिती 2 बाद 100 अशी झाली होती. लॅथम व रवींद्र यांनी द्विशतकी भागीदारी करीत सामन्यावर नियंत्रण मिळवून दिले. विंडीजच्या केमार रॉच व ओजय शील्ड्स यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. नव्या डब्ल्यूटीसीमधील न्यूझीलंडची ही पहिली कसोटी आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प.डाव 231, विंडीज प.डाव 167 (तेजनारायण चंद्रपॉल 52, शाय होप 56, जेकब डफी 5-34, मॅट हेन्री 3-43, फॉक्स 2-32), न्यूझीलंड दुसरा डाव 95 षटकांत 4 बाद 417 : लॅथम 145, रचिन रवींद्र 185 चेंडूत 176, कॉनवे 37, विल्यमसन 9, विल यंग खेळत आहे 21, ब्रेसवेल खेळत आहे 6, अवांतर 23. रॉच 2-61, शील्ड्स 2-64.