सर रिचर्ड हॅडली पदकाचा रचिन रवींद्र सर्वांत तरुण मानकरी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडला भारतातील विश्वचषक मोहिमेदरम्यान गवसलेला रचिन रवींद्र हा बुधवारी देशाचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू बनल्यानंतर सर रिचर्ड हॅडली पदकाचा सर्वांत तरुण मानकरी बनला आहे. महिलांमध्ये मेली केरने न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख पुरस्कार पटकावले आहेत. ‘एएनझेड टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार केन विल्यमसनला कसोटीतील त्याच्या उत्कृष्ट फॉर्मबद्दल मिळाला आहे.
24 वर्षांचा रवींद्र हा पुरस्काराच्या इतिहासातील सर्वांत तरुण मानकरी आहे, एकाच हंगामात तो न्यूझीलंडच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांचा मुख्य आधार बनला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकदिवसीय संघात प्रवेश केल्यानंतर रवींद्रने भारतातील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत 64 च्या सरासरीने 578 धावा केल्या, ज्यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. तसेच स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने नाबाद 123 धावा केल्या होत्या.
परिणामी रवींद्रला ‘आयसीसी’चा 2023 सालासाठीचा उगवत्या खेळाडूकरिता ठेवलेला पुरस्कार प्राप्त झाला आणि चेन्नई सुपर किंग्जसोबत 3 लाख 50 हजार डॉलर्सचा इंडियन प्रीमियर लीग करार देखील मिळाला. सर रिचर्ड हॅडली पदकामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रवींद्रसाठी या हंगामाची समाप्ती धूमधडाक्यात झाली आहे. या मोसमात त्याने तिन्ही प्रकारांत किवींसाठी योगदान दिलेले आहे. रवींद्रने कसोटीतही आपली वाढ सुरू ठेवली असून बे ओव्हल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 240 धावा काढल्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
दुसरीकडे, ‘एएनझेड’ वर्षाची एकदिवसीय आणि टी-20 खेळाडू तसेच ‘ड्रिम इलेव्हन सुपर स्मॅश वुमन्स प्लेयर ऑफ दि इयर’ म्हणून निवड झाल्यानंतर डेबी हॉकले पदकही जिंकून केरने महिला क्रिकेटमधील प्रमुख पुरस्कार आपल्या ख्घत्यात जमा केले.