राज्यातील रब्बीचा पेरा घटणार! पाऊस व जलसाठ्याअभावी यंदाचा रब्बी हंगाम संकटात
पुणे / प्रतिनिधी
राज्यात यंदा कमी पाऊस झाला असला, तरी रब्बीच्या सरासरी क्षेत्रामध्ये सुमारे 9 टक्के वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. राज्यातील सरासरी 53.97 लाख हेक्टरवर रब्बीचे पीक घेतले जात असून, यंदा त्यात 9 टक्क्यांची वाढ होऊन एकूण 58.96 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे दिली. दरम्यान, गेल्या वषीच्या तुलनेत रब्बीच्या पेरा क्षेत्रात मात्र या वर्षी घट होणार आहे. गत हंगामात रब्बीची 61.67 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती 58.76 लाख हेक्टरवर होण्याची शक्मयता आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील कृषी आयुक्तालयात रब्बी हंगामाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी, सहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक व कृषि आयुक्तालयातील अधिकारी, उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, गहू आणि हरभऱ्याचे क्षेत्र सरासरी इतकेच ठेवले जाणार आहे. तर रब्बी ज्वारी तसेच तेलबियांचे क्षेत्र वाढवण्यात येणार आहे. पीक नियोजनाच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता आणि रब्बीचे वाढीव क्षेत्र यांचे योग्य संतुलन साधले जाणार आहे. यंदा मान्सूनचा हंगाम कोरडा गेला. सप्टेंबर महिन्यात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. परंतु काही दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमीन कोरडी पडत आहे. जलसाठेही कोरडे आहेत. परिणामी, या वषी रब्बीचा हंगामात पेरा घटणार आहे. गेल्यावषी 61.67 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती 58.76 लाख होण्याची शक्मयता आहे.
शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 58.76 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या मंडळांमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. तशा अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या आहेत. मात्र, त्यावर काही विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत. ते फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे अधिसूचना जारी झालेल्या सर्व मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा निकषांनुसार दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. खरीप हंगामाप्रमाणे राज्यात रब्बी हंगामातही 1 ऊपयात पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे. यात ज्वारी, गहू, मका, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले.
मुंडे यांचा अजब दावा
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पावसाअभावी पिके करपून जात असल्याचे दिसून आले. सर्व जिल्ह्यांमध्ये दिलासादायक पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अजब दावा केला आहे. पाऊस कमी असला, तरी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी भरलेल्या असल्याचा दावा मुंडे यांनी केला.