रबाडाचा सुपर ‘पंच’, कांगांरु 212 धावांत ऑलआऊट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल : ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 212 धावांत ऑलआऊट
ऑलआऊट : रबाडाचे 5 तर यान्सेनचे 3 बळी : वेबस्टर, स्टीव्ह स्मिथची अर्धशतके
वृत्तसंस्था / लंडन
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा (51 धावांत 5 बळी) आणि मार्को यान्सेन (3 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 56.4 षटकांत 212 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथ, मार्क वेबस्टर यांची अर्धशतके वगळता इतर ऑस्ट्रेलियन फलंदाज फेल ठरल्याचे पहायला मिळाले.
येथील लॉर्ड्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बवुमाचा हा निर्णय योग्य ठरला. सातव्या षटकांतच रबाडाने अनुभवी उस्मान ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या सत्रातच आफ्रिकन वेगवान गोलंदाजांनी दाणादाण उडवून दिली. लंच ब्रेकपर्यंत अवघ्या 67 धावांत त्यांचे 4 फलंदाज तंबूत परतले होते. मार्क लाबुशेन (17), कॅमरुन ग्रीन (4) आणि ट्रेव्हिस हेड (11) या स्टार फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
स्मिथ, वेबस्टरची अर्धशतके
एका बाजूला विकेट जात असताना अनुभवी स्टीव्ह स्मिथने वेबस्टरच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना 79 धावांची भागीदारी साकारली. यादरम्यान, स्मिथने अर्धशतकही झळकावले. अर्धशतकानंतर मात्र संयमी खेळणाऱ्या स्मिथला 66 धावांवर मॅरक्रमने बाद करत आफ्रिकेला मोठे यश मिळवून दिले. त्याने 112 चेंडूचा सामना करताना 10 चौकार लगावले. यानंतर अॅलेक्स केरीही फार काळ मैदानावर टिकला नाही. 4 चौकारासह 23 धावा करत तो केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथ बाद झाला तरी वेबस्टर मात्र खेळपट्टीवर होता आणि तो ऑस्ट्रेलियाच्या धावा वाढवत होता. वेबस्टरही अर्धशतकानंतर शतकासमीप चालला होता. पण त्याचा काटाही रबाडाने काढला. वेबस्टरने यावेळी 11 चौकारांच्या जोरावर 72 धावा केल्या.
212 धावांत कांगांरु ऑलआऊट
यानंतर इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. वेबस्टर बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला जास्त वळवळ करण्याची संधीच दिली नाही. रबाडाने यावेळी मार्को यान्सेनला साथीला घेतले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांत आटोपला. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, हेजलवूड हे फार काळ मैदानात टिकाव धरु शकले नाहीत. यावेळी रबाडाने 51 धावांत पाच विकेट्स मिळवले, तर मार्कोने 49 धावांत तीन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, केशव महाराज आणि मॅरक्रमने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 56.4 षटकांत सर्वबाद 212 (उस्मान ख्वाजा 0, लाबुशेन 17, कॅमरुन ग्रीन 4, स्टीव्ह स्मिथ 10 चौकारासह 66, ट्रेव्हिस हेड 11, वेबस्टर 11 चौकारासह 72, अॅलेक्स केरी 23, रबाडा 5 बळी, यान्सेन 3 बळी, केशव महाराज व मॅरक्रम प्रत्येकी 1 बळी).
रबाडाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे अर्धशतक
आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने 5 बळी घेत कांगांरुचे कंबरडे मोडले. या पाच बळीसह रबाडाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे अर्धशतक पूर्ण केले. रबाडाने कांगारुविरुद्ध कसोटीमध्ये 11 सामन्यांच्या 19 डावात ही कामगिरी केली आहे. याशिवाय, रबाडाने सहाव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये उस्मान ख्वाजाची विकेट काढली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा बाद केले आहे. बुमराह आणि वोक्सने ख्वाजाला कसोटीत सहा वेळा बाद केले आहे. ख्वाजाला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. त्याने 8 वेळा ख्वाजाला बाद केले आहे.
स्टीव्ह स्मिथचा अनोखा विक्रम
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्मिथने 66 धावांची खेळी साकारत संघाचा डाव सावरला. स्मिथ यावेळी 66 धावांवर बाद झाला असला तरी त्याच्या नावावर क्रिकेट विश्वातील वर्ल्ड रेकॉर्ड आता जमा झाला आहे. स्मिथने जेव्हा या सामन्यात 45 धावा पूर्ण केल्या, तेव्हा स्मिथच्या नावावर हा वर्ल्ड रेकॉर्ड जमा झाला. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड यापूर्वी अजिंक्य रहाणेच्या नावावर होता. अजिंक्यने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 199 धावा केल्या होत्या, पण स्मिथने जेव्हा 45 धावा केल्या, तेव्हा त्याच्या या फायनलमधील एकूण 200 धावा पूर्ण झाल्या आणि त्याने रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.