For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रबाडाचे 5 बळी, राहुलचे नाबाद अर्धशतक

06:58 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
रबाडाचे 5 बळी  राहुलचे नाबाद अर्धशतक
Advertisement

पहिल्या दिवशी भारताच्या 8 बाद 208 धावा

Advertisement

  वृत्तसंस्था/ सेंच्युरियन

मंगळवारी बॉक्सिंग डे दिवशी सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी कोलमडली. अंधुक प्रकाश व पावसाचा व्यत्यय आल्याने पहिल्या दिवशी केवळ 59 षटकांचा खेळ झाला. खेळ थांबला तेव्हा भारताने 8 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली होती. राहुल 70 तर र सिराज शून्यावर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेताना 41 धावात 5 गडी बाद केले.

Advertisement

ढगाळ वातावरणात सुरू झालेल्या या पहिल्या कसोटीत मैदानावर पाण्याचे पॅचेस असल्याने नाणेफेकही उशिरा घेण्यात आली. वातावरण पाहून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याने तसेच या खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षित उसळत असल्याने त्याचा लाभ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच उठविला. रबाडाने आपल्या गोलंदाजीच्या दोन्ही हप्त्यात स्विंगवर अधिक भर दिला होता. भारतीय फलंदाजांना रबाडाची गोलंदाजी खेळताना अवघड जात असल्याचे दिसून आले. सोमवारी रात्री येथे पाऊस झाल्याने खेळपट्टी ओलसर होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहणे अवघड गेले.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अचूक फायदा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी घेतला आणि खेळाच्या पहिल्या तासामध्ये चेंडू टेनिसबॉलप्रमाणे अनपेक्षित उसळत असल्याने भारताच्या अव्वल फलंदाजांची सत्वपरीक्षा ठरली. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघातील फलंदाजांनी वनडे सामने अधिक खेळले होते. त्यामुळे त्यांना कसोटीत खेळताना अवघड गेले. रबाडाने आखूड टप्प्यावर गोलंदाजी करत व चेंडू स्विंग करत असल्याने कर्णधार शर्माला अधिक सावधानता बाळगावी लागली होती. जैस्वाल आणि शर्मा यांनी भारतीय संघाच्या डावाला सुरूवात केली. पण पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रबाडाने पुलचा फटका मारणाऱ्या शर्माला बर्गरकरवी झेलबाद केले. सीमारेषेजवळ असलेल्या बर्गरने शर्माचा हा झेल टिपला. त्याने 14 चेंडूत 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने आणखी दोन फलंदाज लवकर गमविले. बर्गरने सलामीच्या जैस्वालला व्हेरेनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 37 चेंडूत 4 चौकारांसह 17 धावा जमविल्या. बर्गरने भारताला आणखी एक धक्का देताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शुभमन गिलला जैस्वालप्रमाणेच व्हेरेनकरवी झेलबाद केले. गिलने 12 चेंडूत केवळ 2 धावा जमविल्या. भारताची यावेळी स्थिती 3 बाद 24 अशी केविलवाणी झाली होती.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत चौथ्या गड्यासाठी 68 धावांची भर घातली. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 71 चेंडूत नोंदविली. उपाहारावेळी भारताने 26 षटकात 3 बाद 91 धावांपर्यंत मजल मारली होती. कोहली 33 तर अय्यर 31 धावांवर खेळत होते.

उपाहारानंतर भारताचे शतक 176 चेंडूत फलकावर लागले. रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरचा त्रिफळा उडाला. त्याने 50 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. रबाडाने विराट कोहलीला यष्टीरक्षक व्हेरेनकरवी झेलबाद केले. किंचित बाहेर जाणाऱ्या एका अप्रतिम चेंडूवर कोहली बाद झाला. रबाडाने आतापर्यंत चौथ्यांदा कसोटीमध्ये कोहलीला बाद केले आहे. कोहलीने 64 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. कोहली बाद झाल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या रवीचंद्रन अश्विन रबाडाच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू मुल्डेरकरवी झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर या जोडीने सातव्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. रबाडा आणि बर्गर तसेच जॅनसेनच्या उसळत्या माऱ्यासमोर शार्दुल ठाकुर दोन वेळेला जखमी झाला. हेल्मेट असूनही ठाकुरच्या कपाळावर उसळता चेंडू आदळल्याने त्याच्यावर मैदानातच प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर एक उसळता चेंडू त्याच्या हातावर आदळल्याने त्याला पुन्हा त्या दुखापतीवर बँडेज करावे लागले. जखमी स्थितीत ठाकुर अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. रबाडाने ठाकुरला एल्गारकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. चहापानावेळी भारताने 50 षटकात 7 बाद 176 धावा जमविल्या होत्या. राहुल 1 षटकार आणि 6 चौकारांसह 39 धावावर खेळत होता. तर बुमराहने आपले खाते उघडले नव्हते. रबाडाने 41 धावात 5 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची रबाडाची ही चौदावी खेप असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडला आहे. रबाडाला बर्गरकडून चांगली साथ मिळाली. त्याने 39 धावात 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 59 षटकात 8 बाद 208 (जैस्वाल 17, रोहित शर्मा 5, गिल 2, कोहली 38, श्रेयस अय्यर 31, केएल राहुल खेळत आहे 105 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 70, रवीचंद्रन अश्विन 8, शार्दुल ठाकुर 24, बुमराह 1, सिराज खेळत आहे 0, अवांतर 12, रबाडा 5-44, बर्गर 2-50, जॅनसेन 1-52).

कर्णधार बवुमा जखमी

द.आफ्रिकेचा कर्णधार बवुमा जखमी झाल्याने मैदानाबाहेर गेला होता. 20 व्या षटकावेळी एक फटका अडवताना त्याला धोंडशिरेची दुखापत झाल्यानंतर लंगडतच त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी मुल्डेरने क्षेत्ररक्षण केले. त्याच्या गैरहजेरीत डीन एल्गारने नेतृत्व केले. बवुमाच्या दुखापतीचे स्वरूप पाहिल्यानंतर त्याच्या सामन्यातील सहभागाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांच्या फिजिओनी सांगितले.

Advertisement
Tags :

.