आर. वैशाली पात्रता फेरी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत दाखल
जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा : जलद बुद्धिबळातील विश्वविजेती कोनेरू हम्पी बाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने येथे शानदार कामगिरी करताना जागतिक ब्लिट्झ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून या कामगिरीने ती स्वत: देखील आश्चर्यचकीत झाली आहे. अलीकडेच जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती बनलेली कोनेरू हम्पी मात्र लवकर स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
कोनेरू हम्पीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक आणि 60,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळवून देणाऱ्या उत्कृष्ट कामगिरीनंतर चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी वैशाली पुढे सरसावली. तिची महिला विभागात सरशी होऊन तीन बरोबरींसह संभाव्य 11 पैकी 9.5 गुण तिने मिळवले. ‘मी मंगळवारच्या कामगिरीवर खूप आनंदित आहे. बुधवारचा दिवस मोठा असेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास असा निकाल मला अपेक्षित नव्हता. बुधवारच्या सामन्यांकरिता मला चांगली तयारी करावी लागेल’, असे वैशाली म्हणाली.
रशियन कॅटरिना लॅग्नो वैशालीच्या अगदी जवळ आली होती. तिने 8.5 गुण मिळवले, तर पात्रता फेरीतील उर्वरित सहा खेळाडूंनी समान आठ गुण मिळवले. गुणांचा निकष पूर्ण करूनही हम्पीला सर्वांत खराब टायब्रेकरमुळे बाहेर पडावे लागले आणि ती नवव्या स्थानावर राहिली. खुल्या विभागात जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनसह 10 खेळाडू पहिल्या स्थानावर राहिले. नॉर्वेजियन खेळाडूने गरजेइतके गुण मिळविले आणि त्याच्या 13 पैकी सहा सामने बरोबरीत सोडविले, पात्रता फेरीच्या शेवटी त्याने आघाडीवर असलेल्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
रशियन इयान नेपोम्नियाचीने सर्वोत्तम टायब्रेकरचा फायदा घेत 9.5 गुणांसह पात्रता फेरी जिंकली, तर अमेरिकेचा फॅबियानो काऊआना तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लसनपेक्षा पुढे म्हणजे दुसऱ्या स्थानावर राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुऊवातीच्या काही आशादायक कामगिरीनंतरही कोणत्याही भारतीयाला आघाडीच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले नाही. अर्जुन एरिगेसीने सुऊवातीला उत्कृष्ट खेळ करून पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये विजय मिळवला. परंतु नंतर त्याची कामगिरी हवी तशी न राहून सातपेक्षा कमी गुणांवर त्याला समाधान मानावे लागले. आर. प्रज्ञानंद 8.5 गुणांसह सर्वोत्तम स्थानावर राहिलेला भारतीय ठरला, परंतु शेवटच्या फेरीत रशियन डॅनिल दुबोव्हकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरीतील स्थान गमवावे लागले.
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत वैशालीचा सामना चिनी ग्रँडमास्टर झू जिनरशी होईल. वैशालीने जॉर्जियाची ग्रँडमास्टर नाना झाग्निड्झे आणि रशियाच्या व्हॅलेंटिना गुनिना यांच्याविऊद्ध सातव्या व आठव्या फेरीत सलग दोन विजय मिळवले आणि स्पर्धेत सहज अव्वल स्थान मिळवून देण्यास ते पुरेसे ठरले. 23 वर्षीय भारतीय खेळाडूने गुनिनाविऊद्ध नाट्यामय खेळ केला. तिथे वेळेच्या मर्यादेचे पालन करण्याचा प्रचंड दबाव तिच्यावर आला आणि फारसा विचार करायलाही वेळ नाही अशा स्थितीत तिने 23 चाली केल्या. ‘विचार करायलाही वेळ नाही अशा स्थितीत तुम्ही तुमच्या चाली खेळत राहायचे असते. त्या सामन्यात माझे वेळ व्यवस्थापन खूपच वाईट राहिले. गुनिना वेळेच्या बाबतीत आणि पटावरही पुढे होती’, याकडे वैशालीने लक्ष वेधले.