नोकरी सोडून कमावते 10 लाख
शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर एकदाची चांगली नोकरी मिळाली, की गंगेत घोडे न्हाले, ही सार्वत्रिक भावना आहे. चांगली नोकरी ही आर्थिक सुरक्षा आणि सन्मान यांचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे अशी नोकरी सोडून देण्याचा अव्यवहारीपणा सहसा कोणी करत नाहीत. तथापि, ब्रिटनमधील लीव्हरपूल येथे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेने अशी भक्कम वेतनाची नोकरी सोडून देण्याचे धाडस दाखविले आणि ते यशस्वीही करुन दाखविले. या महिलेचे नाव जेस बोल्टन-नोल्स असे आहे.
ऐन पंचवीशीत असताना या महिलेने एका उत्तम वेतनाच्या नोकरीला लाथ मारुन नवा मार्ग चोखाळण्याचा निर्धार केला. तिला तिच्या या धोकादायक ठरु शकेल अशा निर्णयापासून प्ररावृत्त करण्याचा प्रयत्न तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रमैत्रिणींनी केला. मात्र, ती आपल्या निर्धारापासून दूर झाली नाही. तिने स्वत:साठी एक नवीन व्यवसाय शोधला. आता ती या व्यवसायातून केवळ दूरध्वनीवर बोलून महिन्याला 10 लाख रुपयांच्या उत्पन्नाची कमाई करीत आहे.
आपल्याला नोकरीचा अतिशय कंटाळा आला होता. म्हणून मी चरितार्थ चालविण्यासाठी अन्य मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात होते. नोकरी तशी बरी होती. महिन्याच्या महिन्यात एकमुष्ट वेतन पदरात पडत होते. त्यातून महिनाभराची गुजराण होत असे. तथापि, नोकरीत ‘थ्रिल’ असे काहीही नव्हते. त्यामुळे तिने आपल्या गर्भारपणाच्या रजेच्या काळात या नव्या व्यवसायाची पायाभरणी केली. हा व्यवसाय डिजिटल उत्पादनांचा होता, अलिकडच्या काळात तो लोकप्रिय झाला आहे. अनेकजण तो करतात. पण केवळ ज्यांच्याकडे या व्यवसायाला आवश्यक कौशल्य आणि ज्ञान आहे, तेच त्यात यशस्वी होतात. पहिल्या तीन महिन्यांमध्येच या महिलेने 30 लाख रुपयांची कमाई केल्यामुळे तिचा उत्साह दुणावला. अखेर तिने नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि याच व्यवसायात स्वत:ला पूर्ण झोकून दिले. हा तिच्यासाठी एक जुगारच होता. पण आता तो यशस्वी झाला आहे. ही महिला आता महिन्याला 10 लाख रुपये कमावत असून ही रक्कम तिच्या पूर्वीच्या वेतनापेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. जेथे साहस आहे, तेथे मार्ग आहे, हे तिने आपल्या कृतीने सिद्ध केल्याने इतरांनाही एक आदर्श मिळाला आहे.