For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्विनवेन, निशिकोरी, रुडची विजयी सलामी

06:50 AM Jan 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्विनवेन  निशिकोरी  रुडची विजयी सलामी
Advertisement

सुमीत नागलचे आव्हान समाप्त, पावसामुळे सामने लांबणीवर

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

2025 च्या टेनिस हंगामातील रविवारपासून येथे सुरु झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत चीनच्या झेंग किनवेन महिला एकेरीत  तसेच जपानचा केई निशिकोरी, कास्पद रुड यांनी पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. भारताच्या सुमीत नागलचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. रविवारी पावसाचा अडथळा आल्याने काही सामने अर्धवट स्थितीत थांबवावे लागले. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीचा सामना जिंकणारा हादी हबीब हा लेबनॉनचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

Advertisement

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंग किनवेनने रोमानियाच्या 20 वर्षीय अॅनेका तोडोनीचा 7-6 (7-3), 6-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. तब्बल एक वर्षापूर्वी याच मेलबर्नच्या हार्ड कोर्टवर झेंगने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण तिला अंतिम सामन्यात साबालेंकाकडून पराभव पत्करावा लागला होता. विद्यमान विजेती आर्यना साबालेंकाचा सलामीचा सामना अमेरिकेच्या स्लोअन स्टिफेन्सबरोबर होत आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या निशिकोरीने थियागो माँटेरोचा 4-6, 6-7 (4-7), 7-5, 6-3, 6-3 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात नॉर्वेच्या सहाव्या मानांकित कास्पर रुडने जॉमी मुनारचा 6-3, 1-6, 7-5, 2-6, 6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मध्यंतरी गुडघा, घोटा आणि मांडीला झालेल्या दुखापतीमुळे निशिकोरीला टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते. तब्बल चार वर्षांनंतर त्याने या स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला. फिनलँडच्या ओटो व्हर्टनेनला आर्थर फिल्सकडून हार पत्करावी लागली. आर्थरने हा सामना 3-6, 7-6 (7-4), 6-4, 6-4 असा जिंकून दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

लेबनॉनचा हबिब विजयी

लेबनॉनच्या हादी हबीबने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या युनचा ओकेटीवर 7-6 (7-4), 6-4, 7-6 (8-6) अशी मात करत विजयी सलामी दिली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीचा सामना जिंकणारा हादी हबीब हा लेबनॉनचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. लेबनॉनच्या 26 वर्षीय हबीबने या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी घेण्यात आलेल्या पात्र फेरीमध्ये तीन सामने जिंकले होते.

नागल पराभूत

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात 25 व्या मानांकित टॉमस मॅकहेकने भारताच्या सुमीत नागलचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात झेकच्या मॅकहेकने सुमीत नागलवर 6-3, 6-1, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. नागलने गेल्यावर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते आणि त्याने पहिल्या फेरीत बुबलिकचा पराभव केला होता.

Advertisement
Tags :

.