दिवाळी खरेदीसाठी शहरात वाहनांच्या रांगाच रांगा
आज नरक चतुर्दशी : शहरात ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी : शहरातील सर्व पार्किंग तळ फुल्ल : जागा मिळेल तेथे लावली वाहने
बेळगाव : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केवळ बेळगावच नाही तर शेजारील चंदगड, सावंतवाडी, गोवा, संकेश्वर, बैलहोंगल या परिसरातील नागरिकही खरेदीसाठी बेळगाव शहरात आले होते. यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील पार्किंग यंत्रणा फुल्ल झाल्याने धर्मवीर संभाजी चौकापासून थेट कॅम्पपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठाल्या रांगा लागल्या होत्या.
सोमवार दि. 20 रोजी नरक चतुर्दशी असून या पार्श्वभूमीवर रविवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटकाच्या मध्यावर बेळगाव असल्यामुळे खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेला प्राधान्य दिले जाते. सावंतवाडी, दोडामार्ग, गोवा, आजरा, गडहिंग्लज, बैलहोंगल हा परिसर 100 कि.मी. च्या आतील असल्याने खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.
शहरातील बापट गल्ली कार पार्किंग सकाळी 9 पूर्वीच फुल्ल झाले होते. त्याच बरोबर रामलिंग खिंड गल्ली येथील खासगी पार्किंग, गवळी गल्ली येथील खासगी पार्किंग येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. धर्मवीर संभाजी चौक परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु सकाळी 11 नंतर तीदेखील फुल्ल झाली होती. त्यामुळे संचयनी सर्कलपासून कॅम्पपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.
शहापूरमध्येही खरेदीसाठी प्रचंड गर्दी
बेळगावबरोबरच शहापूर बाजारपेठेत गोवा तसेच कोकणातील खरेदीदारांची गर्दी होत असते. रविवारी खडेबाजार, शहापूर येथे कपडे, सोने, भांडी यांसह इतर वस्तू खरेदी केल्या जात होत्या. त्यामुळे या परिसरातही वाहनांची कोंडी झाली होती. महात्मा फुले रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांचे पार्किंग करण्यात आल्याचे दिसून आले.