जेपीएफ मेटाकास्ट प्रा.लि.येथे गुणवत्ता महिना उत्सव
बेळगाव :
जेपीएफ मेटाकास्ट प्रा. लि. बेळगाव येथे गुणवत्ता महिना उत्सव दि. 29 नोव्हेंबर रोजी उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वी झाला. विशेष अतिथी म्हणून देवाप्पा मढले (एजीएम, बीईएमएल इंडिया) उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उद्योगातील गुणवत्ता, नवे तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कंपनीचे सीएमडी आणि एमडी यांनी आपल्या मनोगतामधून गेल्या वर्षातील कंपनीच्या यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला. तसेच सर्व कर्मचारी व पुरवठादारांचे कौतुक केले. गुणवत्ता महिन्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट काइझेन, सर्वोत्तम पोस्टर, सर्वोत्तम स्लोगन आणि सर्वोत्तम निबंध या विभागांत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय, सातत्याने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण साहित्य पुरवल्याबद्दल कंपनीकडून विविध पुरवठादारांनाही गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कोअर सप्लायर पुरस्कार- अंकिता एंटरप्रायझेस, सर्वोत्कृष्ट शेल मोल्ड सप्लायर पुरस्कार- विघ्नेश इंडस्ट्रीज, सर्वोत्कृष्ट मशीन शॉप विक्रेता पुरस्कार- एन. इंजिनिअरिंग व एस. जे. इंजिनिअरिंग, प्रकाश होम इंडस्ट्री यांना वर्ष 2024-25 मधील सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवत्ता महिना उत्सवाला कर्मचारी, अधिकारी व पुरवठादारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाने संबंधितांचे आभार मानले.