भारतात नव्हे अमेरिकेत होणार क्वाड बैठक
‘होमटाउन’ला जाणार मोदी : 2025 मध्ये भारतात होणार आयोजन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
हिंदी महासागरात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी स्थापन क्वाड संघटनेची बैठक यंदा भारतात आयोजित होणार नाही. भारताने क्वाड परिषद आयोजित करण्याची स्वत:ची संधी अमेरिकेला प्रदान केली आहे. भारत आता 2025 मध्ये क्वाड परिषदेचे आयोजन करणार आहे.
प्रत्यक्षात भारतात क्वाड परिषद जानेवारी 2024 मध्ये आयोजित होणार होती, परंतु त्यावेळी अमेरिकेने अध्यक्ष जो बिडेन यांच्याकडे वेळ नसल्याचे सांगत परिषद सप्टेंबरपर्यंत टाळली होती. क्वाड परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सामील होतात. ही संघटनेची सर्वात महत्त्वाची बैठक असते. अमेरिकेत क्वाड परिषद 21 सप्टेंबर रोजी आयोजित होऊ शकते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सामील होतील.
क्वाडची परिषद अमेरिकेत होणार असल्याने बिडेन यांना अध्यक्ष म्हणून स्वत:ची अखेरची परिषद आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. चालू वर्षाच्या अखेरीस अमेरिकेच्या निवडणुकीत जो कुणी उमेदवार विजयी होईल तो पुढील वर्षी भारतात क्वाड परिषदेसाठी येणार असल्याचे यामुळे निश्चित आहे. म्हणजेच कमला हॅरिस किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी एकाचा भारत दौरा निश्चित असेल.
बिडेन यांच्या होमटाउनमध्ये आयोजन
क्वाडची परिषद अमेरिकेत बिडेन यांचे गृहराज्य डेलावेयरमध्ये होणार आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासाठी ही क्वाडची अखेरची परिषद असणार आहे, कारण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ते उमेदवार नसतील. तर पंतप्रधान मोदी आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करणार नाहीत. त्यांचे भाषण 26 सप्टेंबर रोजी होणार होते. नव्या वेळापत्रकानुसार 28 सप्टेंबर रोजी विदेशमंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी 21 सप्टेंबरला क्वाड बैठकीत सामील होतील, यानंतर 22 रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतील. मोदी 22-23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या समिट फॉर फ्यूचर कार्यक्रमात भाग घेणार आहेत.
न्यूयॉर्कमध्ये परिषदेची होती मागणी
भारताने क्वाड परिषद न्यूयॉर्क येथे व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु 21 सप्टेंबर रोजी शनिवार असून अमेरिकेचे अध्यक्ष वीकेंडला डेलावेयर येथे स्वत:च्या घरी जातात. याचमुळे अमेरिकेने डेलावेअरमध्ये परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
2023 मध्ये टाळली होती परिषद
2023 ची क्वाड परिषद जपानच्या हिरोशिमा शहरात आयोजित झाली होती. त्यापूर्वी ही परिषद ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात आयोजित होणार होती. परंतु त्यावेळी अमेरिकेतील कर्जसंकटामुळे आणि बिडेन यांच्या आग्रहामुळे ती टाळण्यात आली होती. त्यानंतर ही परिषद जी7 देशांच्या बैठकीच्या कालावधीत निश्चित करण्यात आली होती. हिरोशिमामध्ये पंतप्रधान मोदींनी 2024 ची परिषद भारतात आयोजित होणार असल्याची घोषणा केली होती. या परिषदेसाठी सर्व सदस्य देशांचे प्रमुख भारतात येणार होते. क्वाडचे अध्यक्षत्व दरवर्षी सर्व सदस्य देशांदरम्यान रोटेट होत असते. 2023 मध्ये याचे अध्यक्षत्व जपानकडे राहिले होते.
भारतासाठी आवश्यक क्वाड
रणनीतिक स्वरुपात चीनच्या आर्थिक आणि सैन्यशक्ती म्हणून झालेल्या उदयाला प्रत्युत्तराच्या स्वरुपात क्वाड ही संघटना भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरते. चीनसोबत भारताचा दीर्घकाळापासून सीमा वाद राहिला आहे. अशास्थितीत सीमेवर चीनची आक्रमकता वाढली तर भारत क्वाडच्या अन्य सदस्य देशांची मदत मिळवू शकतो. तसेच क्वाडद्वारे भारत चीनच्या अरेरावीला अंकुश लावत आशियात शक्तिसंतुलनाची भूमिका बजावू शकतो.