अंटार्क्टिकात पिरॅमिडसारखी संरचना
परग्रहवासीयांशी कनेक्शन असल्याची चर्चा
अंटार्क्टिकात हिमाच्छादनात एक असा पर्वत दडलेला आहे, जो प्राचीन इजिप्तच्या पिरॅमिडसारखा दिसतो. यावरून अनेक अचंबित करणाऱ्या थेअरीज समोर आल्या आहेत. यातील एका थेअरीनुसार या पिरॅमिडसदृश पर्वताची निर्मिती परग्रहवासीयांनी केली आहे. अंटार्क्टिका एकीकडे हिमाच्छादित शिखरं आणि तेथील निर्जन वातावरणामुळे नेहमीच रहस्यमय राहिले आहे. तेथे पिरॅमिड सदृश पर्वत पाहून सर्वजण थक्क होत आहेत.
हा पर्वत पहिल्यांदा 2016 मध्ये चर्चेत आला होता, तेव्हा याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. टोकदार आणि अचूक पिरॅमिडसारखा आकार पाहून लोकांनी याला परग्रहवासीयांची कारागिरी ठरविले. हे एखाद्या प्राचीन संस्कृतीचे काम असून ती कधीकाळी येथे वसली असणार, असा दावा अनेक लोकांनी केला आहे.
हा पर्वत एल्सवर्थ पर्वतरांगेत असून याची उंची सुमारे 4150 फूट आहे. हा पर्वत सर्वप्रथम 1935 मध्ये अमेरिकन एव्हिएटर लिंकन एल्सवर्थ यांनी पाहिला होता. हा पर्वत पॅट्रियट हिल्सनजीक असून जेथे अनेकदा हवामान वैज्ञानिक स्वत:चे संशोधन करत असतात. 2016 मध्ये याची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आणि याला एलियन्स किंवा प्राचीन संस्कृतीचे अवशेष ठरविले जाऊ शकते. पंरतु वैज्ञानिकांनुसार हा पूर्णपणे नैसर्गिक आहे.
पिरॅमिडसारखा आकार कसा मिळाला?
वैज्ञानिकांनुसार या पर्वताचा अनोखा आकार फ्रीज-थॉ इरोजनमुळे निर्माण झाला आहे. या प्रक्रियेत दिवसा बर्फ वितळतो आणि रात्री ते पाणी खडकांच्या भेगांमध्ये गोठून फैलावते. कालौघात ही प्रक्रिया खडकांना तोडते आणि त्याचा आकार बदलते. लाखो वर्षांपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेने या पर्वताला पिरॅमिडसारखा आकार दिला आहे. तज्ञांनुसार या पर्वताच्या तीन बाजूची शिखरं समान स्वरुपात झिजल्याने चौथ्या बाजूने म्हणजेच पूर्व रिजने वेगळा आकार घेतला.
एलियन्सची थेअरी
पिरॅमिडसारखा आकार असल्याने अनेक लोकांनी याला प्राचीन इजिप्तिशियन संस्कृती किंवा एलियनच्या निर्मितीशी जोडले. परंतु वैज्ञानिक या दाव्यांना फेटाळतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एरिक रिग्नॉट यांनी पिरॅमिडसारखा आकार असलेला पर्वत असाधारण नाही, अनेक पर्वतरांगांमध्ये अशाप्रकारची शिखरं दिसून येत असल्याचे सांगितले आहे.
निसर्गाचा अद्भूत चमत्कार
या पर्वताच्या आसपास 500 दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म देखील मिळाले आहेत. यामुळे या पर्वताला आणखी खास स्वरुप प्राप्त झाले आहे. वैज्ञानिक याला पृथ्वीच्या भूगर्भीय शक्ती आणि नैसर्गिक प्रक्रियांचे आकर्षक उदाहरण मानतात.