पीव्ही सिंधूची विजयी सलामी
रोईंगमध्ये बलराज पनवर उपांत्यपूर्व फेरीत : टेटेमध्ये मनिका बात्रा, बॉक्सिंगमध्ये निखत झरीनचे शानदार विजय
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी युवा नेमबाज मनू भाकरने कांस्यपदकासह भारताला यश मिळवून दिले. रमिता जिंदाल व अर्जुन बबुता यांनीही अंतिम फेरी गाठत पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. रविवारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा, बॉक्सिंगमध्ये निखत झरीन व रोईंगमध्ये बलराज पनवर यांनी शानदार विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे अनुभवी टेबलटेनिसपटू शरथ कमल व टेनिसपटू सुमीत नागल यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन वेळ ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या साखळी फेरीच्या लढतीत मालदीवच्या फातिमथ अब्दुल रज्जाकवर सरळ गेममध्ये दणदणीत विजय मिळवत पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात केली. तिसऱ्या ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीत असलेल्या सिंधूने प्रतिस्पर्धी फातिमथला 21-9, 21-6 असे पराभूत करण्यासाठी केवळ 29 मिनिटे घेतले. आता, दहाव्या मानांकित सिंधूची पुढील लढत एस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबोशी होईल.
टेटेमध्ये मनिका बात्राचा विजयी प्रारंभ
टेबल टेनिसमध्ये भारताची अव्वल खेळाडू मनिका बात्राने ग्रेट ब्रिटनच्या अॅना हर्सीवर शानदार विजय मिळवून आपल्या मोहीमेला सुरूवात केली. टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ 64 मधून राऊंड ऑफ 32 मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तिच्याधी श्रीजा अकुलाने विजय मिळवत पुढची फेरी गाठली. तिने अॅना हर्सीचा 4-1 असा पराभव केला. याशिवाय, अन्य भारतीय खेळाडू श्रीजा अकुलाने राऊंड ऑफ 64 च्या सामन्यात स्वीडनच्या क्रिस्टीना कलबर्गचा 4-0 असा पराभव केला. या विजयासह तिने राऊंड 32 च्या फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे पुरुषांच्या एकेरी गटात अनुभवी शरथ कमलला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला स्लोवानियाच्या डेनी कोजुलने हरवले. आता, तो मिश्र दुहेरी प्रकारात सहभागी होईल.
रोईंगमध्ये बलराज उपांत्यपूर्व फेरीत
रविवारी भारताचा स्टार रोवर बलराज पनवरने पुरुष एकेरी स्कल्स रोईंग प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शनिवारी झालेल्या हिट्समध्ये तो चौथ्या स्थानी राहिला होता, यामुळे त्याला रेपचेज गटात खेळण्याची संधी मिळाली. रविवारी झालेल्या रेपचेजमध्ये तो दुसऱ्या हिटमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. यामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. त्याने आपली शर्यत 7 मिनिटे 12.41 सेकंदात पूर्ण केली.
बॉक्सिंगमध्ये निखत झरीन, प्रीती पवारचा विजयी पंच
भारतीय बॉक्सर निखत झरीनने महिला बॉक्सिंगच्या 50 किलो वजनी गटातील सलामीचा सामना जिंकला आहे. तिने जर्मनीच्या मॅक्सी कॅरिना क्लोत्झरचा 5-0 असा पराभव केला. निखतचा पुढील सामना आशियाई चॅम्पियन चीनच्या वू यूशी होणार आहे. याशिवाय, महिलांच्या 54 किलो गटात प्रीती पवारने व्हिएतनामच्या वो थी किमचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरी गाठली आहे. तिचा पुढील सामना कोलंबियाच्या मार्सेला यिनीशी होईल.
तिरंदाजीत भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. या स्पर्धेत भारताची पदकाची आशा संपुष्टात आली आहे. नेदरलँड्सने भारतीय संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. डच संघाने सामन्याचा पहिला सेट 52-51 असा जिंकून दोन गुण घेतले. त्यानंतर दुसरा सेट 54-49 आणि 53-48 असा जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि भजन कौर यांना संघात चांगली कामगिरी करता आली नाही.
टेनिसपटू सुमीत नागल ऑलिम्पिकमधून बाहेर
रविवारी टेनिसमध्येही भारताला धक्का बसला. सुमित नागलला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. सुमितला फ्रान्सच्या कोरेन्टिन माउटेट (जागतिक क्रमवारी-68) 2-6, 6-2, 5-7 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह सुमित नागल ऑलिम्पिकमधून बाहेर झाला आहे.