पुतीन यांची युक्रेनला पुन्हा धमकी
ट्रम्प यांच्या शांतता योजनेवरील चर्चेची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनमध्ये युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा एक सुरुवात आहे. हा प्रस्ताव भविष्यातील मजबूत शांतता करारांचा आधार ठरू शकतो. आम्ही यावर गांभीर्याने चर्चा करण्याची गरज असल्याचे म्हणत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनला सैन्य मागे घेण्यासाठी धमकाविले आहे. रशियन सैन्याचा कब्जा असलेल्या भागांमधून युक्रेनचे सैनिक मागे हटले तरच युद्ध समाप्त होणार आहे. युक्रेनचे सैन्य मागे न हटल्यास आमचे सैन्य त्यांना मागे हटविणार, असे पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्याची अमेरिकेची योजना भविष्यातील कराराचा आधार ठरू शकते. पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ यांच्या नेतृत्वात अमेरिकेचे शिष्टमंडळ मॉस्को येथे दाखल होईल. रशिया ‘गंभीर चर्चे’साठी तयार असल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले.
युक्रेनच्या मोठ्या भूभागावर कब्जा
युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर रशियाचा कब्जा आहे. यात जवळपास पूर्ण लुहान्स्क भाग, डोनेट्स्क, खेरसॉन आणि झापोरिज्जियाचे काही हिस्से सामील आहेत. या चारही भागांवरील दावा युक्रेनने पूर्णपणे सोडून द्यावा, अशी मागणी रशिया करत आहे. रशियाने अलिकडच्या आठवड्यांमध्ये पूर्व युक्रेनच्या सीमेवर आघाडी मिळविली असून यात सर्वात महत्त्वपूर्ण पोक्रोवस्क शहराच्या आसपासचे भाग सामील आहेत. काही भूभाग रशियाला सोपविण्यास युक्रेन तयार होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. यातील काही भूभाग हे युक्रेनच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.
अमेरिकेचा प्रस्ताव
अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. यावर युक्रेन आणि त्याच्या सहकारी देशांनी जिनिव्हा येथे चर्चा केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या शांतता योजनेवर रशियातही चर्चा होतेय. तर यासंबंधीची चर्चा अयशस्वी ठरल्यास रशियाकडून हल्ले तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.