युक्रेनशी चर्चेसाठी पुतीन सहमत
युद्ध थांबवण्यासाठी भारत-चीन-ब्राझीलची मध्यस्थी शक्य : शांतता चर्चेबाबत रशियाची घोषणा
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युव्रेनशी युद्धात तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. भारत, चीन किंवा ब्राझील हे तीन देश दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करू शकतात, असेही पुतीन यांनी सांगितले. रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममधील चर्चेदरम्यान पुतीन यांनी युद्धजन्य स्थितीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तुर्कीने दोन्ही देशांदरम्यान करार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या अटींची कधीच अंमलबजावणी झाली नाही. आता पूर्वीचे प्रयत्न नव्याने चर्चा सुरू करण्यासाठी आधार म्हणून वापरले जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
रशिया-युव्रेन युद्ध संपवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हे युद्ध संवादातून संपवावे, अशी भारताची इच्छा आहे. यासाठी भारताने रशिया आणि युव्रेन या दोन्ही देशांशी चर्चा केली आहे. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही भारत युद्ध थांबवू शकतो, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी भारतासोबतच चीनलाही याचे श्रेय दिले आहे. रशिया आणि युव्रेनमध्ये केवळ भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ म्हणून काम करू शकतात, असे पुतीन म्हणाले.
फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर एका महिन्यानंतर तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये रशिया आणि युव्रेनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. युद्ध थांबवणे हा त्याचा उद्देश होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध थांबवण्यासाठी दोन अटी ठेवल्या होत्या. युव्रेनला डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझिया येथून आपले सैन्य मागे घ्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते. याशिवाय युव्रेन कधीही नाटोचा भाग होणार नाही. मात्र, युव्रेनने या अटी मान्य करण्यास नकार दिल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान संघर्ष सुरूच आहे.
झेलेन्स्की यांचीही भारताला पसंती
भारतात शांतता शिखर परिषद आयोजित केली जाऊ शकते, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले होते. पुतीन यांचे हे विधान दोन महिन्यांपूर्वी 8 जुलै रोजी पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना आले होते. येथे त्यांनी पुतीन यांच्याशी युद्ध थांबवण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी 23 ऑगस्टला युव्रेनलाही भेट दिली. यादरम्यान युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारतात दुसरी शांतता शिखर परिषद आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. झेलेन्स्कींसोबतच्या भेटीनंतर मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली होती. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे. शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून संघर्षाची स्थिती थांबवता येईल असे स्पष्ट करतानाच सध्याची स्थिती एकमेकांविरोधात युद्ध पुकारण्यासाठी योग्य नसल्याचा दावा मोदींनी केला होता.
अडीच वर्षांपासून रशिया-युव्रेन संघर्ष
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युव्रेन युद्ध सुरू झाले होते. या संघर्षाला आता अडीच वर्षे झाली आहेत. दरम्यान, आतापर्यंत युव्रेनमधील 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 18,500 लोक जखमी झाले आहेत. रशियाने 3.92 लाख सैनिक गमावल्याचा युव्रेनचा दावा आहे. रशिया-युव्रेन युद्धात 6 ऑगस्ट 2024 रोजी युव्रेनने रशियामध्ये प्रवेश करत त्यांचे कुर्स्क क्षेत्र ताब्यात घेतले. तेव्हापासून युव्रेन सातत्याने रशियावर हल्ले करत आहे. गेल्या 20 दिवसांत युव्रेनच्या हल्ल्यात 31 रशियन नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. युव्रेनने दोन आठवड्यात रशियाचे 1,263 चौरस किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेतले होते. 2024 च्या 8 महिन्यात रशियाने जितकी जमीन बळकावली होती त्यापेक्षा जास्त जमीन दोन आठवड्यात ताब्यात घेतल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियन भूमी परकीय सत्तेने काबीज केली आहे.