'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कारवाई
'पुष्पा 2' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी अनेक घटना घडल्या. या घटनांसदर्भात सुपरस्टार अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.
४ डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी अल्लु अर्जुन थिएटरमध्ये आला होता, त्यावेळी थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेलं. या प्रकरणासंदर्भात अभिनेत्याची येथे चौकशी केली जाणार आहे.
अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. अभिनेता अल्लू अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं.
या संदर्भात अल्लू अर्जून म्हणाला, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला हे दु:खद आहे, चित्रपटाच्या रिलिजवेळी चित्रपटगृहात येणं साहजिक आहे, याआधीही आपण अनेकदा चित्रपटगृहात आलो आहे, मात्र अशा घटना कधी घडली नाही. थिएटरजवळ पोहोचण्याआधी आपण थिएटर मॅनेजमेंट आणि ACP यांना कळविले होते. मी थिएटरमध्ये पोहोचण्यावेळी कोणताही निष्काळजीपणा केला नाही. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटकेसह तपास प्रक्रियेला स्थगिती देण्याचे अंतरिम आदेश जारी करण्यात यावेत, अशी विनंती त्याने केली.