‘पुष्पा 2’चा तब्बल 415 कोटींचा गल्ला
दोन दिवसात जगभरात भरभक्कम कमाई : शाहरुखच्या ‘जवान’चा विक्रम मोडला : भारतात 265 कोटींहून अधिक कमाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा 2’ने रिलीजच्या दोन दिवसांत जगभरात सुमारे 415 कोटींची कमाई केली आहे. तसेच भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन 265 कोटींच्या पुढे पोहोचले आहे. तसेच पुष्पा 2 ने हिंदी आवृत्तीमध्ये सुमारे 131 कोटी रुपये कमावले आहेत. एकंदर या चित्रपटाने जगभरात कमाईच्या बाबतीत शाहरुख खानचा जवान आणि एसएस राजामौलीचा चित्रपट ‘आरआरआर’ला मागे टाकले आहे.
पहिल्या दिवशी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने हिंदी आवृत्तीत 72 कोटींची कमाई केली होती. पुष्पा 2 चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनबद्दल बोलायचे तर, जगभरात 294 कोटी रुपये कमावले होते. यामध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन 175.1 कोटी रुपये होते. ‘पुष्पा 2’ने एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचा विक्रम मोडला. त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर 133 कोटींची कमाई केली होती.
‘पुष्पा 2’ हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा या चित्रपटात पुष्पराजच्या भूमिकेत झळकला आहे. रश्मिका मंदान्नाही श्रीवल्लीच्या अवतारात दिसत आहे. चित्रपटाची कथा जबरदस्त असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट भुरळ घालत आहे.