पालिकेत धक्काबुक्की; कर्मचाऱ्यांचे आंदोलन
सातारा :
गोडोलीतील बागडवाड्यात दोन ठिकाणी कार्यक्रम असल्याने तेथील स्थानिकांच्या मागणीनुसार नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पालिकेच्या वाहतूक विभागाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. मागणी करुनही टँकर पोहोच न झाल्याने शेखर मोरे पाटील हे पालिकेत गेले. तेथे त्यांचा आणि वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यात सुरुवातीला शाब्दीक झाली, नंतर धक्काबुक्की झाली, असा आरोप प्रशांत निकम यांनीच केला. त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. सातारा पालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या समोर निषेध नोंदवत काम बंद आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांना कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, शेखर मोरे-पाटील यांच्यावर झालेल्या आरोपाच्या निषेधार्थ आणि पालिकेच्या विरोधात गोडोलीकर मोर्चा काढणार आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे हा वाद पाण्यावरुन पेटला आहे.
सातारा शहराच्या पूर्व भागाला जलवाहिनीच्या गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्याच अनुषंगाने कामाठीपुरा, बागडवाडा परिसरात दोन ठिकाणी घरगुती कार्यकर्ते बुधवारी होते. एक साखर पुड्याचा आणि बारशाचा कार्यक्रम होता. दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पाण्याची गरज असल्याने तेथील स्थानिकांनी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांना फोन करुन पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तसेच पालिकेकडेही त्यांनी टँकर मागणी केली होती. मात्र, टँकर न आल्याने त्यांनी शेखर मोरे पाटील यांना फोनवरुन याबाबतची माहिती दिली. त्यावरुन शेखर मोरे पाटील बुधवारी दुपारी 1 वाजता पालिकेत पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर इमारतीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबीनच्या बाहेरच वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत निकम हे त्यांना दिसले. तेव्हा त्यांनी पाण्याच्या टँकरबाबत विचारणा केली. जाणीवपूर्वक मलाच फक्त त्रास देता निकमसाहेब असे म्हणताच निकम यांनीही मी नियमानुसारच वागतोय असे शब्दाने शब्द दोघांमध्ये झाले. सगळे वातावरण तंग झाले. दोघांमध्ये वादाची चर्चा सगळ्या पालिकेत बुधवारी दिवसभर सुरु होती. परंतु त्याची वाच्यता कुठे झाली नाही. अखेर गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्वच पालिकेचे कर्मचारी एकत्र जमले. त्यांनी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करत पालिकेच्या गेटवरच निषेध नोंदवला. त्यांनी या घडलेल्या प्रकाराची माहिती फोनवरुन मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिली. दुपारपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते.
पालिकेतील सर्वच विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी पालिकेचे वाहतूक विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना धक्काबुक्की झाल्याची बातमी लगेच पालिकेलल्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून निषेध नेंदवण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी गोडोलीत गाडी पाठवली होती-प्रशांत निकम
याबाबत प्रशांत निकम हे म्हणाले, आमच्या कर्मचाऱ्यांनी गोडोलीत गाडी पाठवली होती. परंतु पत्ता न सापडल्याने ती गाडी परत आली. तर एक गाडी चाळकेवाडी येथे आग लागली तिकडे पाठवली होती. मला किशोर शिंदे यांनी गाडी मागितलेली माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले.
माझी काहीच चुकी नाही-शेखर मोरे-पाटील
नगरसेवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, मी आमच्या भागातल्या नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. परंतु मला जाणीवपुर्वक टार्गेट करण्याचे डावलण्याचा प्रकार येथे निदर्शनास आला. मी काय माझ्या घरात पाणी मागत नव्हतो. सातारा शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत होती. असे असताना पालिकेच्या कर्मचाऱ्याकडून उर्मट वर्तन होत असेल तर त्यांच्या निषेधार्थ सर्वसामान्य सातारकर म्हणून जनता रस्त्यावर उतरणार आहे. गोडोली ते पालिका मोर्चा काढून पालिकेतील उर्मट अधिकाऱ्याचा निषेध नोंदवणार आहोत, असे नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले..