मुलाच्या मित्राशी ११ वर्ष अनैतिक संबंध
विवाहबाह्य संबंधातील काटा काढण्यासाठी, पत्नीनेच दिली पतीची सुपारी
सतिश वाघ खून प्रकरण
पुणे
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतिश वाघ यांची अपहरण करून हत्या झाली. या प्रकरणासंदर्भात नवनवीन गोष्टी समोर येत असतानाच, पुणे पोलिसांना याचा छडा लावण्यात यश आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जवळकर आणि सतिश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे गेल्या अकरा वर्षापासून अनैतिक संबंध होते. यातूनच या हत्येचा कट रचला असल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी अक्षय जवळकर हा ३२ वर्षांचा आहे. २०१३ मध्ये आरोपी अक्षय साधारण २१ वर्षांचा आणि मोहिनी वाघ ३७ वर्षांच्या असल्यापासून हे अनैतिक संबंध आहेत. २००१ मध्ये जवळकर कुटुंबिय सतिश वाघ यांच्या घरात भाड्याने रहायला आले होते. २०१६ पर्यंत म्हणजे साधारण १५ वर्ष हे जवळकर कुटुंबिय वाघ यांच्या घरात राहत होते. यापैकी २०१३ ते २०१६ या तीन वर्षांत मोहिनीचे स्वतःच्या मुलाच्या मित्राशीच विवाहबाह्य संबंध जुळले होते. या प्रकरणाची कुणकुण सतिश वाघ यांना लागली असताना त्यांचे जवळकर कुटुंबियांशी वाद झाले. त्यानंतर २०१६ मध्ये जवळकर कुटुंब तिथून बाहेर पडले आणि दुसरीकडे राहू लागले. तरीही या दोघांमधील संबंध कायम होते, अशी माहिती समोर आली.
मोहिनी वाघ यांच्या दाव्यानुसार पती सतिश वाघ यांच्याकडून त्यांना सतत मारहाण केली जायची, त्यांना घरातील आर्थिक व्यवहार स्वतःच्या हाती हवे होते. मोहिनीने अक्षय जवळकर सोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे.
मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या सतिश वाघ यांचा काटा काढण्यासाठी हा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे. सतिश वाघ यांच्यावर ७० वार करून त्यांचा खून केला आहे. त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सुरुवातील पैश्यांसाठी ही हत्या झाली असल्याचा बनाव उभा करत, मोहिनी त्यांच्या मुलासोबत रडत होत्या. पतीच्या मृत्यूच्या दुःखाचे नाटक करत होत्या. पण पोलिसांच्या तपासात पत्नीनेच पतीचा खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी अक्षयसह त्यांच्या मित्रांना आणि मोहिनी वाघ यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कळाली.