पुसेसावळीच्या जवानाचे डेहराडून येथे हृदयविकाराने निधन
पुसेसावळी :
डेहराडून येथे कर्तव्यावर असलेल्या पुसेसावळी (ता. खटाव) येथील जवान प्रमोद जगन्नाथ कदम (वय 40) यांचे शुक्रवारी 3 रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. हुतात्मा कदम यांच्या पार्थिवावर रविवार 5 रोजी सकाळी शासकीय इतमामात पुसेसावळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रमोद कदम हे बी.एस्सी. शिक्षण पूर्ण झाल्यावर 2003 मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सतरा वर्षांच्या नोकरीच्या कालखंडात त्यांनी बेंगलोर, उत्तराखंड, डेहराडून येथे सेवा बजावली. सेना सेवा कोअर 514 बटालियन देहरादून येथील सेनेत ते हवालदार पदावर कार्यरत होते. पुढील वर्षी 2026 मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक असताना शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच पुसेसावळी गावावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने येणार असून रविवारी सकाळी पुसेसावळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी सर्व तयारी केली आहे. अंत्ययात्रा रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी येथील मुख्य चौकातून काढण्यात येणार आहे.
संपूर्ण शहरातून अंत्ययात्रा काढून येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर असलेल्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी दिली. प्रमोद यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.