गणरायासाठी पूजेच्या साहित्याची खरेदी
गणेशोत्सव एक दिवसावर : स्वागतासाठी भक्तांची धडपड : फळ-फुलांना बहर
बेळगाव : गणेशोत्सव अगदी एक दिवसावर आल्याने गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग वाढली आहे. बाजारात फळ-फुलांबरोबर पूजेच्या साहित्य खरेदीलाही वेग आला आहे. बाजारपेठेत फळ, फुलांबरोबर पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. विशेषत: फळ, फुलांबरोबर कापूर, अगरबत्ती, धूप, लाकडी पाट, रुमाल, आरतीचे ताम्हण, हळदी-कुंकु, अबीर गुलाल, रांगोळी, विड्याची पाने, सुपारी, दुर्वा, हार, समई आदी पूजेच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. अलीकडे पर्यावरणाचा विचार करून धूप लावण्याचे प्रमाण वाढले आहे. धुपातील गुणवैशिष्ट्यांमुळे चिलटे, किडे यांचा प्रादुर्भाव होत नाही, अशी धारणा आहे. त्यामुळे धुपाची खरेदी वाढली आहे. शिवाय त्यामध्ये असंख्य नमुने उपलब्ध आहेत.
श्रीमूर्तीच्या उपासनेमध्ये काही विशिष्ट समाजामध्ये दोरा किंवा दोऱ्यात गुंतलेले हार चालत नाहीत. त्याला पर्याय म्हणून कापसाचे गेज वस्त्राच्या किंवा फुलवातीचा वापर करून हार तयार करण्यात येतात. कापसाच्या या हारांचे अनेक नमुने महिला तयार करतात. पांढऱ्या शुभ्र कापसाच्या फुलावर कुंकवाचे बोट टेकवल्याने तो अधिकच सुबक दिसतो. विक्रेत्यांकडे आज कापसाच्या वाती, फुलवाती, गेजवस्त्र मिळत असले तरी प्रामुख्याने गृहोद्योग स्वरुपात महिला त्या वाती तयार करतात.
पूर्वी देवासमोरील दिव्यासाठी घरातील वापराचे तेलच वापरले जात असे. आज देवासमोरील दिव्यासाठी वेगळे तेल मिळत आहे. दुकानांमध्ये तसेच मॉलमध्येसुद्धा हे तेल उपलब्ध झाले आहे. आज पूजा साहित्य मिळण्याची स्वतंत्र दुकाने आहेत. शिवाय मॉलमध्येसुद्धा पूजा साहित्याचे स्वतंत्र दालन मांडण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती आणि घरगुती गणेश मूर्तींसमोर विविध फळे आणि पूजेचे साहित्य मांडले जाते. यासाठी पूजेच्या साहित्याची आणि फळ-फळांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सव काळात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी पूजा साहित्याला अधिक पसंती मिळू लागली आहे. बाजारात फुले, नारळ आणि पाच फळांना मागणी वाढू लागली आहे. केळ्यांची मागणी अधिक प्रमाणात आहे. सफरचंद, संत्री, पेरू, चिकू, मोसंबी तसेच काकडीसह फळांची विक्री होत आहे. त्यामुळे बाजारात फळफळावळांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.