जिल्ह्यात नवीन वाहन खरेदी सुसाट
दोन वर्षांत 1 लाख 87 हजार वाहनांची नोंदणी : आरटीओच्या महसुलात वाढ
► प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्ह्यात वाहन खरेदी जोरदार सुरू आहे. मागील दोन वर्षांत वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ देखील वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सहा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 2023 व 2024 या दोन वर्षांत 1 लाख 87 हजार 181 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.
प्रत्येकाच्या घरात दुचाकी, चारचाकी वाहने असावीत, असे स्वप्न असते. त्यानुसार शक्य त्या वाहनांची खरेदी केली जाते. बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगावसह चिकोडी, गोकाक, अथणी, रामदुर्ग अशी विभागीय कार्यालये आहेत. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षामध्ये 99 हजार 308 वाहनांची नोंदणी झाली होती. तर एप्रिल ते डिसेंबर 2024 या दरम्यान 87 हजार 873 वाहनांची नोंदणी झाली आहे.
बेळगावसह चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, अथणी, रामदुर्ग प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 16 लाख 34 हजार वाहने आहेत. मालवाहू, बिगर मालवाहू तसेच खासगी वाहनांचा यामध्ये समावेश आहे. बेळगाव आरटीओ कार्यालयांतगृ 7 लाख 12 हजार वाहने आहेत. बैलहोंगल आरटीओ कार्यालयांतगृ 1 लाख 66 हजार 917 वाहने आहेत. चिकोडी आरटीओ विभागांतगृ 3 लाख 89 हजार 100 वाहने असल्याची नोंद आरटीओ विभागाकडे आहे.
बेळगाव विभागात 5 लाख 79 हजार 072 दुचाकी तर 86 हजार 510 चारचाकी कार आहेत. चिकोडी विभागात 3 लाख 30 हजार 105 दुचाकी तर 17 हजार 055 कार आहेत.
नवीन ट्रेंड आला की खरेदीत वाढ-नागेश मुंडास (प्रादेशिक परिवहन अधिकारी)
नवीन वाहनांचा ट्रेंड आला की खरेदीमध्ये वाढ होत जाते. अनेक बँका, फायनान्स वाहनांसाठी कर्जपुरवठा करत असल्याने दुचाकी, चारचाकी तसेच कमर्शियल वाहनांची खरेदी वाढली आहे. 2023-24 मध्ये 1 कोटी 90 लाख रुपये तर डिसेंबर 2024 पर्यंत 1 कोटी 58 लाख रुपयांचा महसूल आरटीओ विभागाकडे जमा झाला आहे.
कार्यालयातील एजंटराज दूर करा
| आरटीओ विभागाने ऑनलाईन सेवा सुरू केल्या असल्या तरी अद्यापही कार्यालयांना एजंटांचा विळखा आहे. वाहन नोंदणी, वाहन परवाना, वाहन परवान्याचे नूतनीकरण यासह इतर कामांसाठी एजंटांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे आरटीओ विभागाने कार्यालयातील एजंटराज दूर करून सर्वसामान्यांना कमीतकमी दरात सेवा कशा मिळतील याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. |