अखेर त्या बेवारस श्वानांच्या पिल्लांना आधार मिळाला
मंगेश तळवणेकर यांच्या भूतदयेचे कौतुक
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात जेलच्यामागे झुडुपात अज्ञाताने कुत्र्याची सहा छोटी पिल्ले सोडून दिल्यानंतर ही पिल्ले भुकेने विव्हळत होती. याची माहिती श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांना समजताच त्यांनी तात्काळ या पिल्लांना दुकानातील दुध पाजून त्यांची भूक भागविली. त्यानंतर या पिलांसाठी खास पिंजरा करुन बेवारस कुत्र्यांसाठी देवदूत असलेल्या चराठा निधी सावंत यांच्याकडे कुत्र्याच्या या पिलांची रवानगी केली. त्यामुळे मंगेश तळवणेकर यांच्या या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.एक महिन्यांच्या या कुत्र्यांच्या पिल्लांन अज्ञात व्यक्ती सावंतवाडी जेलनजिकच्या झुडपात ठेवून गेला. त्यानंतर ही पिल्ले भुकेने विव्हळत होती. मंगेश तळवणेकर यांना हे समजताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत या पिल्लांना नजीकच्या श्री निर्गुण यांच्या दुकानात आणून दूध पाजले. त्यानंतर ही पिल्ले कोणाला पाहिजे असल्यास नेण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून केले. त्यानंतर एका सद्द्गृहस्ताने यातील दोन पिले नेली. तोपर्यंत गेले चार दिवस या पिल्लांची देखभाल मंगेश तळवणेकर यांच्यासह नेहा निलेश निर्गुण, सोहम राऊळ, वैशाली सावंत यानी केली. त्यानंतर अशा बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांसाठी देवदूत असणाऱ्या चराठा येथील निधी सावंत यांच्याशी संपर्क साधला. परंतु त्यांच्याकडे या पिल्लांसाठी ज्यादा पिंजरा नसल्याचे समजताच या चार पिल्लांसाठी मंगेश तळवणेकर यांनी आपल्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून खास पिंजरा तयार केला. त्यात ही कुत्र्याची पिल्ले घालून गाडीने त्याची चराठा येथील निधी सावंत यांच्या बेवारस कुत्र्यांच्या आश्रय स्थानात रवानगी केली. दरम्यान अशा मुक्या जीवांना अज्ञात स्थळी सोडून त्यांचे हाल करणे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे त्यामुळे अशा छोट्या मुक्या पिल्लांना अज्ञात स्थळी सोडू नये असे आवाहन मंगेश तळवणेकर यानी केले आहे.