गडबडलेल्या चेन्नईसमोर पंजाबचे कठीण आव्हान
प्रतिनिधी/ मुल्लानपूर
महेंद्रसिंह धोनीच्या शेवटच्या षटकांतील फलंदाजीत ती पूर्वीची आग राहिलेली नसून मंगळवारी येथे पंजाब किंग्जचा सामना करताना चेन्नई सुपर किंग्सला या कच्च्या दुव्यावर उपाय काढावा लागेल. आयपीएल हंगामांतील त्यांच्या सर्वांत वाईट सुऊवातीपैकी एक नोंदविताना सीएसकेने आता पराभवांची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे आणि हे सर्व पराभव लक्ष्याचा पाठलाग करताना नोंदले गेले आहेत.
पंजाब किंग्सने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविऊद्ध मागील सामना गमावला असला, तरी सध्याच्या फॉर्मचा विचार करता तसेच कागदावरही श्रेयस अय्यरचा संघ सीएसकेपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. सीएसके सध्या संघरचना जाग्यावर टाकण्यास झुंजत आहे. एकेकाळी वरदान मानली जाणारी तळाकडील धोनीची उपस्थिती ‘येलो ब्रिगेड’साठी त्रासदायक ठरत आहे. ‘ब्रँड धोनी’ अजूनही सीएसकेच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे आणि मैदानात उतरल्यावर त्याचा जयजयकार होतो. पण दिल्ली कॅपिटल्सविऊद्धचा सामना त्याच्या समर्थकांना निश्चितच पुढे जाण्याची वेळ आली आहे हे जाणवून देणारा होता. दिल्लीविरुद्ध 25 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बोलताना मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची असहाय्यता स्पष्ट झाली होती. सदर सामन्यात धोनीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्नही केला नाही.
सीएसकेच्या विरोधातील संघ आता प्रथम फलंदाजी करून 180 पेक्षा जास्त धावा काढण्याची अपेक्षा बाळगतात. कारण शिवम दुबेने फटकेबाजी केली नाही, तर सीएसकेला हे लक्ष्य गाठणे कठीण आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे. दुबे कधी यशस्वी आणि कधी अयशस्वी होईल हे सांगणे कठीण बनले आहे. सीएसकेच्या वरच्या फळीतही गोंधळ असून तिथे कर्णधार ऋतुराज गायकवाडला त्याचे सलामीचे स्थान सोडावे लागलेले आहे.
पंजाबचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल आणि चहल-धोनी ही लढत काय रंग दाखवते ते पाहावे लागेल. चहल आणि धोनी आयपीएल सामन्यांमध्ये 10 वेळा एकमेकांविऊद्ध खेळले आहेत आणि हरयाणाच्या गोलंदाजाने पाच वेळा या दिग्गजाला बाद केलेले आहे. पंजाब किंग्ससाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि तऊण नेहल वधेराचा फॉर्म ही मोठी अनुकूल बाजू आहे.
संघ-चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वधेरा, ग्लेन मॅक्सवेल, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, एरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला ओमरझाई
सामन्याची वेळ : संध्या. 7:30 वा.