आरसीबीसमोर पंजाबच्या फिरकीचे आव्हान
वृत्तसंस्था/बेंगळूर
यंदाच्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या फलंदाजांवर अवलंबून राहणार असून ते आज शुक्रवारी येथे अत्यंत आत्मविश्वासाने भरलेल्या पंजाब किंग्सविऊद्धशी लढणार आहेत. यावेळी ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने फिरकी मारा करणाऱ्या धूर्त युजवेंद्र चहलला ते कसे रोखतात यावर बरेच काही अवलंबून असेल. बेंगळूरच्या फलंदाजांनी आर. साई किशोर (2/22, गुजरात टायटन्स) तसेच कुलदीप यादव (2/17) आणि विप्रज निगम (2/18, दोन्ही दिल्ली कॅपिटल्स) यांच्याविऊद्ध येथे केलेला संघर्ष चहल व मॅक्सवेल यांनी पाहिलेला असेल. याशिवाय चहल आणि मॅक्सवेल यांनी रॉयल चॅलेंजसमध्ये अनेक वर्षे घालविलेली असल्याने येथील परिस्थितीशी ते चांगलेच परिचित असतील. गुजरात आणि दिल्लीविरुद्ध आरसीबीने प्रथम फलंदाजी केली आणि नंतर त्यांच्या फिरकीपटूंनी दव नसलेल्या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. यातून संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळालेला असू शकतो.
आरसीबीकडेही कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा असे फिरकीपटू आहेत. पंजाब संघाकडे अर्शदीप सिंग आणि मार्को जेनसेनसारखे सक्षम वेगवान गोलंदाज आहेत, पण ते आरसीबीच्या जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारइतके भेदक नाहीत. दोन्ही कर्णधारांचा विचार करता रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यरमध्ये फारसे साम्य नाही. अय्यरने यापूर्वी कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केलेली आहे व या स्पर्धेत फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दुसरीकडे, पाटीदार आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधार बनला आहे. असे असले, तरी निकालांची पर्वा न करता आपापल्या संघाला दोघांनीही शांतपणे मार्गदर्शन केलेले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मार्को जेनसेन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, यश ठाकूर, सूर्यांश शेडगे, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, हरप्रीत ब्रार, अजमतुल्ला ओमरझाई, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, एरोन हार्डी, कुलदीप सेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.