For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबचा सातवा विजय, लखनौचा 37 धावांनी केला पराभव

06:55 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंजाबचा सातवा विजय   लखनौचा 37 धावांनी केला पराभव
Advertisement

पंजाबची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप : प्रभसिमरनची 91 धावांची खेळी, अर्शदीपचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ धरमशाला

प्रभसिमरनच्या 91 धावांची शानदार खेळीनंतर अर्शदीप सिंग (16 धावांत 3 बळी) गोलंदाजीत दाखवलेल्या कमालीच्या जोरावर पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर 37 धावांनी विजय मिळवला. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 236 धावांचा डोंगर उभा केला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र लखनौला 199 धावापर्यंत मजल मारता आली. लखनौकडून आयुष बडोनीने सर्वाधिक 74 धावांची खेळी साकारली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Advertisement

पंजाबने विजयासाठी दिलेल्या 237 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये तीन फलंदाजांना माघारी पाठवले. मॅरक्रम 13 धावा काढून आऊट झाला तर मिचेल मार्शला भोपळाही फोडता आला नाही. निकोलस पूरन 6 धावांवर बाद झाला. या तिन्ही विकेट्स अर्शदीपने घेतल्या. यानंतर कर्णधार ऋषभ पंतही फारसा काही चमत्कार दाखवू शकला नाही. 18 धावांवर त्याला ओमरझाईने बाद केले. स्टार फलंदाज डेव्हिड मिलरनेही सपशेल निराशा केली.

आयुष बडोनी, समदची झुंज व्यर्थ

सलामीच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे लखनौची 5 बाद 73 अशी स्थिती झाली होती. यावेळी आयुष बडोनी व अब्दुल समद यांनी 81 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात असेपर्यंत लखनौचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, समद 24 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारासह 45 धावा काढून बाद झाला. बडोनीने सर्वाधिक 40 चेंडूत 5 चौकार व 5 षटकरासह 74 धावांची खेळी साकारली. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाला अन लखनौच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. आवेश खान 19 धावांवर नाबाद राहिला. लखनौला 7 गडी गमावत 199 धावापर्यंत मजल मारता आली.

पंजाबचा 236 धावांचा डोंगर

लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबला सुरुवातीलाच धक्का बसला. सलामीवीर प्रियांश आर्य काही खास करू शकला नाही आणि 4 चेंडूत 1 धाव केल्यानंतर पहिल्याच षटकात 2 धावांवर आऊट झाला. यानंतर, जोश इंग्लिस आला आणि त्याने काही तुफानी फटके मारले आणि 14 चेंडूत 30 धावा केल्या. त्यानंतर प्रभसिमरन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सावध फलंदाजी केली. या जोडीने 78 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दरम्यान, श्रेयस अय्यर 25 चेंडूत 45 धावा काढून आऊट झाला. नेहल वधेराही 16 धावा करून आऊट झाला.

दुसरीकडे, प्रभसिमरनने मात्र शानदार फलंदाजी साकारताना लखनौच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 48 चेंडूत 91 धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. यानंतर शशांक सिंगने 15 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी केली. यामुळे लखनौने 20 षटकांत 5 गडी गमावत 236 धावांचा डोंगर उभा केला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्स 20 षटकांत 5 बाद 236 (प्रभसिमरन सिंग 48 चेंडूत 91, जोस इंग्लिस 30, श्रेयस अय्यर 45, शशांक सिंग नाबाद 33, मार्क स्टोनिस नाबाद 15, आकाश सिंग व दिग्वेश राठी प्रत्येकी दोन बळी)

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 7 बाद 199 (मॅरक्रम 13, ऋषभ पंत 18, आयुष बडोनी 40 चेंडूत 74, अब्दुल समद 45, आवेश खान नाबाद 19, अर्शदीप सिंग 3 बळी, ओमरझाई 2 बळी, चहल व यान्सेन प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.