पंजाबचा सलग दुसरा विजय
प्रभसिमरन-श्रेयस अय्यरची तुफानी खेळी : लखनौचा दुसरा पराभव
वृत्तसंस्था/ लखनौ
प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर पंजाबने लखनौचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला. लखनौने दिलेले विजयासाठीचे 172 धावांचे आव्हान पंजाबने 16.2 षटकातच पार केले आणि 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, पंजाबचा हा सलग दुसरा विजय ठरला असून गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा हा तीन सामन्यातील दुसरा पराभव ठरला आहे.
लखनौच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबचा संघ मैदानात उतरला आणि त्यांना प्रभसिमरन सिंगने दणक्यात सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने सुरुवातीपासूनच तुफानी फटकेबाजी केली आणि जलदपणे आपले अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूंत 9 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 69 धावांची दमदार खेळी साकारली. प्रियांश आर्य 8 धावा काढून बाद झाला.
श्रेयसची फटकेबाजी
प्रभसिमरन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 67 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रेयसने लखनौच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 30 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 52 धावांचे योगदान दिले तर नेहलने 25 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. श्रेयस व वढेरच्या या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने विजयासाठीचे लक्ष्य अवघ्या 16.2 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनौकडून दिग्वेश राठीने दोन गडी बाद केले तर इतर गोलंदाजांनी मात्र निराशा केली.
लखनौच्या पदरी निराशा
प्रारंभी, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी आणखी एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांना निराश केले. सलामीवीर मिचेल मार्शला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकात तो बाद झाला. मॅरक्रमने 18 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 28 धावांची खेळी साकारली. फर्ग्युसनने त्याला बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. कर्णधार ऋषभ पंतने पुन्हा एकदा निराशा केली. 2 धावांवर मॅक्सवेलने त्याला तंबूत पाठवले.
पूरन-बडोनीची संयमी खेळी
मागील दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा निकोल्स पूरन हा 30 चेंडू खेळून 44 धावा करून युझवेंद्र चहलने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये पूरनने दोन षटकार आणि पाच चौकार मारले. डेव्हिड मिलर देखील संघासाठी फार मोठी कामगिरी करू शकला नाही. त्याने 18 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या आणि मार्को यान्सेनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसरीकडे, आयुष बडोनीने 33 चेंडूत 41 तर अब्दुल समादने 12 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह नाबाद 27 धावांची धमाकेदार खेळी साकारली. यामुळे लखनौला 20 षटकांत 7 बाद 171 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक :
लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 7 बाद 171 (मॅरक्रम 28, निकोल्स पूरन 44, आयुष बडोनी 41, डेव्हिड मिलर 19, अब्दुल समाद 27, अर्शदीप सिंग 3 बळी, फर्ग्युसन, मॅक्सवेल, यान्सेन व चहल प्रत्येकी एक बळी)
पंजाब किंग्स 16.2 षटकांत 2 बाद 177 (प्रियांश आर्या 8, प्रभसिमरन सिंग 34 चेंडूत 69, श्रेयस अय्यर 30 चेंडूत 52, नेहाल वढेरा नाबाद 43, दिग्वेश राठी 2 बळी).