राजस्थानसमोर पंजाबचे लोटांगण
सामनावीर जोफ्रा आर्चरचे 3 बळी तर जैस्वालची धमाकेदार खेळी : पंजाब 50 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ मुल्लनपूर
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानने पंजाब किंग्सवर 50 धावांनी विजय मिळवला. संजू आणि यशस्वी जैस्वाल यांनी धडेकाबाज सलामी दिली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला 205 धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पंजाबने सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्यामुळे त्यांना या सामन्यात वर्चस्व राखता आले. राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय ठरला, तर पंजाबच्या संघाचा हा पहिलाच पराभव ठरला आहे.
राजस्थानच्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला सुरुवातीलाच धक्के बसले. त्यामुळे त्यांची अवस्था 4 बाद 43 अशी झाली होती. पण त्यानंतर नेहाल वधेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण दोन चेंडूंमध्ये हे दोघेही बाद झाले आणि पंजाबच्या हातून सामना निसटला. वधेराने यावेळी 41 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या, तर मॅक्सवेलने 21 चेंडूंत 30 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पंजाबला 9 बाद 155 धावापर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3 तर संदीप शर्मा, थिक्षणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
जैस्वालची अर्धशतकी खेळी
या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 89 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. सॅमसन 26 चेंडूत 38 धावा काढून बाद झाला, तर डावखुरा फलंदाज यशस्वीने 3 चौकार आणि 5 षटकारांसह 67 धावा केल्या. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 10 वे अर्धशतक 40 चेंडूत पूर्ण केले. हे दोघे बाद झाल्यानंतर रियान परागने 43, नितीश राणा 12, शिमरॉन हेटमायरने 20 आणि ध्रुव जुरेलने नाबाद 13 धावा केल्या. यामुळे राजस्थानला 20 षटकांत 4 बाद 205 धावांचा डोंगर उभा करता आला. पंजाबकडून लॉकी फर्ग्युसनने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 4 बाद 205 (यशस्वी जैस्वाल 67, संजू सॅमसन 38, रियान पराग नाबाद 43, नितीश राणा 12, हेटमायर 20, फर्ग्युसन 2 बळी)
पंजाब किंग्स 20 षटकांत 9 बाद 155 (प्रभसिमरन सिंग 17, नेहाल वढेरा 62, मॅक्सवेल 30, आर्चर 25 धावांत 3 बळी, संदीप शर्मा व थिक्षणा प्रत्येकी दोन बळी).